
नांदेड – दक्षिण भारतातील गंगा म्हणून ओळखली जाणारी आणि मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेली गोदावरी नदी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी नांदेड महापालिकेने हाती घेतलेल्या प्रयत्नांना आता प्रत्यक्ष यश येत असल्याचे स्पष्ट होत आहे. गोदावरी नदीत प्रतिदिन मिसळणारे १० दशलक्ष लिटर अशुद्ध पाणी आता चुनाल नाला येथे उभारलेल्या मल शुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून गोदावरी नदीत सोडले जाणार आहे. या मल शुद्धीकरण केंद्रास नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी शनिवारी भेट देऊन या प्रकल्पाबाबत माहिती घेतली. महापालिकेने हाती घेतलेला हा प्रकल्प प्रत्यक्ष कार्यान्वित झाल्याचा आणि गोदावरी शुद्धीकरणाच्या प्रयत्नांना यश आल्याचा मनस्वी आनंद यावेळी आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी व्यक्त केला.
नांदेड शहरातून वाहणाऱ्या पवित्र गोदावरी नदी पात्रास प्रदूषण मुक्त करण्यासाठी नांदेड महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. अनेक समाजसेवी संस्थांनी या प्रश्नाकडे महापालिका प्रशासन तसेच राज्य सरकारचे वेगवेगळ्या मार्गांनी लक्ष वेधले होते. यासाठी वेगवेगळी आंदोलनही झाले होते. गोदावरी नदी कायम प्रदूषण मुक्त करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय नदी कृती आराखडा अहवाल ऑगस्ट २००९ मध्ये राज्याच्या पर्यावरण विभागाच्या सचिवाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. या अहवालानंतर राज्य शासनाने नदी संवर्धन प्रकल्प अंतर्गत नांदेड महापालिकेला उस्मानशाही चुनाल नाल्याचे प्रदूषण प्रतिबंध करण्यासाठी शासनाने १७ कोटी ४१ लाख ३३ हजार ८९१ रुपये मंजूर केले होते. या रकमेतील ८० टक्के वाटा राज्य शासनाने आणि २० टक्के वाटा महापालिकेने उचलावयाचा आहे. त्यानुसार १३ डिसेंबर २०१९ रोजी शारदा कन्स्ट्रक्शन अँड कॉर्पोरेशन यांना या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. हे काम आजघडीला पूर्ण झाले असून चुनालनाला येथील मल शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. या कामावर आजपर्यंत १५ कोटी ८८ लाख ४० हजार ३७० रुपये खर्च झाला आहे. यातील १ कोटी ६४ लाख १६ हजार ५८४ रुपये अद्यापही शासनाकडून प्राप्त झाले नाहीत.
नांदेडमध्ये गोदावरी नदीत मिसळणाऱ्या एकूण १७ लहान मोठ्या नैसर्गिक नाल्यापैकी सर्वाधिक मोठा असलेल्या उस्मानशाही चुनाल नाल्यातून गोदावरी नदीत जवळपास १० दशलक्ष लिटर अशुद्ध पाणी प्रतिदिन गोदावरी नदीत मिसळत होते. या चुनाल नाल्यातून गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी चुनालनाला मल शुद्धीकरण केंद्रात १० दशलक्ष लिटर क्षमतेचे मुव्हिंग बेड बायो फिल्म रिॲक्टर टेक्नॉलॉजी वापरून येथे घाण पाणी शुद्ध केले जात आहे. हे शुद्ध पाणी गोदावरी नदीत सोडले जात आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांना मूर्त स्वरूप आले आहे.
या प्रकल्पात शुद्ध होणारे पाणी मागणी आल्यास बांधकामांनाही वापरण्यासाठी देण्यात येणार आहे. त्याचवेळी राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे विभाग यांनाही पाणी देण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. यातून महापालिकेला काही प्रमाणात उत्पन्नही अपेक्षित आहे. मात्र प्रामुख्याने गोदावरी नदीत मिसळणारे घाण पाणी रोखण्यासाठीच हा प्रकल्प उभारण्यात आला असल्याचे आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी स्पष्ट केले. शनिवारी आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी चुनालनाला मल शुद्धीकरण प्रकल्पास भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता विश्वनाथ स्वामी, उपअभियंता प्रकाश कांबळे, सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा फरहतउल्ला बेग, क्रीडा अधिकारी रमेश चवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या चुनाल नाला प्रकल्पासह नांदेड शहरात आता गोदावरी शुद्धीकरणासाठी अमृत 2.0 योजनेअंतर्गत गोदावरी नदीच्या समांतर १२०० मी.मी व्यासाची ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या वाहिनीस सर्व नाले जोडले जाणार आहेत. त्यामुळे नांदेड शहरातील एकही नाला थेट गोदावरीत न मिसळता सदर नाल्यांचे पाणी थेट शुद्धीकरणासाठी बोंढार मल शुद्धीकरण केंद्राकडे नेण्यात येणार आहे. हे कामही प्रगतीपथावर आहे. गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूने अशी ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात गोदावरी शुद्धीकरणाचे प्रयत्न यशस्वी होतील असा विश्वासही आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी व्यक्त केला.