
नांदेड – प्रधानमंत्री आवास योजनेसाठी शासनाने उपलब्ध केलेला निधी वेळेत लाभार्थींना वाटप न करणे, योजनेचा लाभ नागरिकांना देण्यासाठी दक्षता न घेणे तसेच शासनास निधीची मागणी विहित वेळेत न करणे आदी कारणावरून नांदेड महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेचे उपअभियंता तथा विभाग प्रमुख संघरत्न गणपतराव सोनसळे यांना तडकाफडकी निलंबित करण्याची कारवाई महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केली आहे.
नांदेड महापालिका हद्दीत प्रधानमंत्री आवास योजने संदर्भाने अनेक तक्रारी वाढल्या होत्या. अनेक लाभार्थी योजनेचा लाभ मिळत नसल्याबाबत महापालिका आयुक्त कार्यालयात तक्रारी करत होते. त्याचवेळी ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर आहे. त्यांचे अनेक हप्ते रखडले होते. विशेष म्हणजे महापालिकेला प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी उपलब्ध असतानाही तो अखर्चित राहिल्याची बाबही या चौकशीत पुढे आली आहे. त्याचवेळी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आवश्यक तो निधी शासनाकडे वेळोवेळी मागणी करण्याबाबतही या विभागाने कुचराई केली होती. त्यामुळे योजनेचा लाभ मिळण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. त्यामुळे एकूणच योजनेच्या अंमलबजावणीत होत असलेला विलंब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी विभाग प्रमुख तथा संघरत्न सोनसळे यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.