
नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने एकूण २० प्रभागातील ८१ जागांसाठी मंगळवारी आरक्षण सोडत प्रक्रिया डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे पार पाडण्यात आली. पालिकेच्या २० प्रभागातील ८१ जागांपैकी ४१ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. या आरक्षण सोडतीमध्ये एकूण ८१ नगरसेवकापैकी ४१ महिला नगरसेवक राहणार आहेत. अनुसूचित जातीच्या एकूण १५ जागापैकी ८ जागा या महिलांसाठी, अनुसूचित जमातीच्या दोन जागांपैकी एक जागा महिलेसाठी, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २१ पैकी ११ महिला आणि खुल्या प्रवर्गातील ४३ पैकी २१ महिला सदस्यांसाठी आरक्षण काढण्यात आले.
डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व उपआयुक्त स. अजितपालसिंघ संधू, निवडणूक विभागाचे उपआयुक्त नितीन गाढवे व सहाय्यक आयुक्त मनिषा नरसाळे यांनी आरक्षण प्रक्रियेचा सर्व मसुदा उपस्थितांसमोर सादर केला. या आरक्षण सोडतीस माजी नगरसेवक, नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
शासनाने २० मे २०२५ रोजी महानगरपालिकेच्या प्रभागातील जागा आरक्षित करण्याचे नियम प्रसिध्द केले होते त्याप्रमाणे आरक्षणाची सोडत राबविण्यात यावी असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने पालिकेस दिले असुन आयोगाच्या दि.२४ ऑक्टोबर २०२५ च्या आदेशानुसार पालिकेच्या २० प्रभागांमधील प्रत्येक जागांचे आरक्षण कसे असेल याबद्दलचा प्रस्ताव महानगरपालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला असता त्यास आयोगाने मान्यता दिली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार मंगळवारी ही आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडण्यात आली. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या एकूण २० प्रभागातून ८१ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्यात ४१ महिला आहेत. प्रभाग क्र.२० मधून ५ उमेदवार तर उर्वरीत १९ प्रभागातून प्रत्येकी ४ उमेदवार निवडून द्यायचे आहेत.
मंगळवारी पार पडलेल्या आरक्षण सोडतीचे प्रारुप राज्य निवडणूक आयोगाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर सोमवार दि.१७ नोव्हेंबर रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. यावर हरकती व सुचना सादर करण्याचा कालावधी दि.१७ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर असा असणार आहे. हरकती व सुचना निवडणूक विभाग, स्टेडीयम परिसर, नांदेड येथे स्विकारण्यात येणार आहेत. दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल असे यावेळी मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी सांगितले.



