
नांदेड – प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेस १० फेब्रुवारी २०२५ रोजी १० कोटी ८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. निधी उपलब्ध करून देताना सदर निधी तात्काळ लाभार्थ्यांना निधी वितरित करण्याचेही निर्देश दिले होते. या निर्देशानुसार नांदेड महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजना विभागाने एकही दिवस सुट्टी न घेता अवघ्या १८ दिवसात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना १० कोटी ८ लाख रुपयांचे वितरण करून एक नवा उच्चांक गाठला आहे. दरम्यान नांदेड शहरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत ६ हजार ८८० लाभार्थ्यांना हक्काचा निवारा प्राप्त झाला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारकडून प्राप्त सदर निधी तात्काळ खर्च करण्याचे शासनाचे आदेश होते. तसेच देयके प्रलंबित असणाऱ्या लाभार्थ्यांना निधी वाटप करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. त्यानुसार महानगरपालिकेतील प्रधानमंत्री आवास योजना कार्यालयामार्फत एकूण १८ दिवसांमध्ये सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये ऑनलाइन निधी वाटप करण्यात आलेला आहे. प्रथम टप्प्याच्या लाभार्थ्यांना एक लक्ष रुपये, दुसऱ्या टप्प्याच्या लाभार्थ्यांना एक लाख रुपये व तिसऱ्या टप्प्याच्या लाभार्थ्यांना ५० हजार रुपये याप्रमाणे निधी वाटप करण्यात आलेला आहे. महानगरपालिकेच्या पंतप्रधान आवास योजना कार्यालय, लेखापरीक्षण विभाग लेखा विभाग व सल्लागार यांचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी या अठरा दिवसांमध्ये कोणती सुट्टी न घेता अविरतपणे पणे काम करून लाभार्थ्यांना निधी वाटप केलेला आहे. सदर काळामध्ये तिसऱ्या हप्त्याची देयके मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी महानगरपालिकेमध्ये विकास शुल्काच्या रकमा भरणा केलेले आहेत. अशा घरकुल लाभार्थ्यांची संख्या ६०० हून अधिक आहे.
पंतप्रधान आवास योजना विभागाने ही कामगिरी आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या नियंत्रणाखाली व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त सुप्रिया टवलारे, मुख्य लेखा अधिकारी जनार्दन पकवान्ने यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख प्रकाश कांबळे, सीएलटीसी टीममधील पी. बी. कांबळे, असरार खान, पल्लवी बेहेरे, कनिष्ठ अभियंता किशन डुकरे, मनोहर दंडेवाड, ठाणेदार खिझर, लिपिक वर्षा सोनटक्के, लिपिक सीमा औंढेकर, विशाल जोंधळे, बुंदेलकर, बबन लोखंडे ऑडिट विभागाचे तिरुपती तिडके, लेखा विभागाचे संजय कुलकर्णी, स्वानंद देशपांडे, खंडू गजभारे, शेख हाफिज व सल्लागार यांची पूर्ण टीम बिलाल शेख, अजमत बेग, इंजि. आवेज शेख, कुणाल नरवाडे, अन्सार शेख, जुबेर, पिंपळगावकर इत्यादींनी परिश्रम घेतले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नांदेडमध्ये आतापर्यंत १८५ कोटी रुपयांचा खर्च…नांदेड शहरात २०१८ पासून सुरू झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत १८५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. यातून पात्र लाभार्थ्यांना ८ हजार २८१ घरकुल मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील ५ हजार ८८० घरकुलांचे काम पूर्ण झाले आहेत. आजघडीला चालू घरकुलांची टक्केवारी ९७ टक्के तर पूर्ण झालेल्या घरकुलांची टक्केवारी ही ८३ टक्के इतकी असल्याची माहिती प्रधानमंत्री आवास योजनेचे विभाग प्रमुख उपअभियंता प्रकाश कांबळे वर्ग १ यांनी दिली. त्याचवेळी या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी विकास शुल्कापोटी नांदेड महापालिकेला ४० लाखाहून अधिक उत्पन्न प्राप्त करून दिले आहे.