राजकीय

आज होणार विधानसभा निवडणुकीची घोषणा 

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या घोषणेकडेही लागले नांदेडकरांचे लक्ष..!

नांदेड – भारत निवडणूक आयोग आज मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्याचवेळी नांदेडमध्ये होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या घोषणेकडेही नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.विधानसभा निवडणुकीसोबत पोटनिवडणूक व्हावी अशी अपेक्षा महाविकास आघाडीची आहे; तर  लोकसभा निवडणुका स्वतंत्रपणे व्हाव्यात अशी भावना महायुतीची आहे. त्यामुळे आता भारत निवडणूक आयोग नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत नेमका कोणता निर्णय घेइल, हे आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्रातील निवडणुकांची घोषणा आज १५ ऑक्टोबर रोजी भारत निवडणूक आयोग करण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये विज्ञान भवन येथे निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर राज्यात गेल्या पाच वर्षात मोठी राजकीय उलथापालथ घडली. प्रारंभी महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर शिवसेनेच्या फुटीतून महायुती सत्तेत आली. पुढे राष्ट्रवादीचा अजित पवार गटही सत्तेत सहभागी झाला. आता महायुती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहे.

एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव केला होता. काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण यांनी ५९ हजार ४४२ मतांनी मोठा विजय नांदेड लोकसभा मतदारसंघात प्राप्त केला. मात्र दुर्दैवाने खासदार वसंतराव चव्हाण यांचे दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी निधन झाले. या निधनानंतर नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लोकसभा सचिवालयाला या रिक्त जागेबाबत माहिती दिली आहे. लोकसभा सचिवालयाकडून भारत निवडणूक आयोगाला रिक्त जागेची माहिती देण्यात येते. दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोज खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले होते. या निधनानंतर लोकसभेच्या पोटनिवडणुका होणे अपेक्षित आहे. विधानसभेच्या निवडणुकासोबतच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक होईल असे मानले जात आहे. राज्यात महाविकास आघाडीला असलेले पोषक वातावरण पाहता लोकसभेची पोटनिवडणूक व्हावी अशी अपेक्षा काँग्रेसची आहे. त्याचवेळी महायुती मात्र लोकसभेची स्वतंत्र निवडणूक व्हावी अशी अपेक्षा बाळगत आहे. त्यामुळे आता भारत निवडणूक आयोग नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत नेमका काय निर्णय घेतो, हे आजच स्पष्ट होणार आहे. संपूर्ण नांदेड जिल्हावासीयांचे नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत होणाऱ्या घोषणाकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात निवडणुका घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक कामासाठी २१ हजार ११५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाली आहे. विधानसभेसोबत नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाल्यास त्यासाठीही प्रशासकीय यंत्रणेने पूर्ण सज्जता ठेवली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ७ हजार १० बॅलेट युनिट, ३ हजार ९२२ कंट्रोल युनिट आणि ४ हजार २३१ व्हीव्हीपॅट मशीन सज्ज ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यात ९ विधानसभा मतदारसंघासाठी ३ हजार ८८ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर या चार जिल्ह्याच्या निवडणूक नोडल अधिकारी व प्रशिक्षण अधिकाऱ्यांची कार्यशाळाही नांदेडमध्ये घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

 

काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रा.रवींद्र चव्हाण यांची घोषणा भाजपाकडून कोण?…नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत घेण्याची घोषणा भारत निवडणूक आयोगाने केल्यास काँग्रेसचा उमेदवार निश्चित झाला आहे. दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी, असा एकमुखी ठराव नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीकडून घेण्यात आला आहे. पण त्याचवेळी भारतीय जनता पार्टीकडून माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह माजी आमदार राम पाटील रातोळीकर, संतुकराव हंबर्डे आदी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनाही लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उतारविण्याची तयारी भाजपाकडून केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकूणच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाचा उमेदवार नेमका कोण राहील याकडेही लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!