महापालिका

महापालिका उपायुक्त अजितपाल संधू ऑफिसर ऑफ द मंथ’सह ‘ऑफिसर ऑफ द इयर’चे मानकरी

स्वातंत्र्यदिनी महापौर कविता मुळे, आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण, वैद्यकीय अधिकारी डॉ.माधुरी मग्गिरवार, क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे यांचाही झाला गौरव

नांदेड – शहरातील खडकपुरा भागात अतिक्रमण कारवाईदरम्यान निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आणि त्यानंतरही मुख्य रस्त्यावरील वर्षानुवर्षांचे हटविलेले अतिक्रमण, नमस्कार चौक ते एमजीएम कॉलेज रस्त्यावरील अतिक्रमण हटविणे, पद्मजा सिटीसमोरील रखडलेल्या रस्त्याचे काम भूसंपादन करून सुरू करणे यासह शहरात काटेकोरपणे अनाधिकृत बॅनरमुक्ती मोहीम राबवणे यासाठी सातत्याने पुढाकार घेत असलेल्या नांदेड महापालिकेचे उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांना महापालिकेचा ‘ऑफिसर ऑफ द मंथ’ आणि ‘ऑफिसर ऑफ द इयर’ हे दोन्हीही पुरस्कार प्राप्त झाले आहेत. स्वातंत्र्यदिनी महापौर कविता मुळे आणि आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते संधू यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन व्हावे, त्यांच्या प्रशासकीय कामाच्या अनुषंगाने योग्य सन्मान होऊन त्यांच्यात कामाप्रती अधिक आस्था आणि हुरुप निर्माण व्हावा, या उदात्त हेतूने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या माननीय आयुक्तांच्या संकल्पनेतून ‘ऑफिसर ऑफ द मंथ’ आणि ‘ऑफिसर ऑफ द इयर’हे अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. आयुक्तांच्या या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण झाली असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आपल्या कामाप्रती नवीन ऊर्जा आणि उत्साह संचारला आहे.

उपायुक्त संधू यांनी आयुक्त डॉ. डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार मागील तीन महिन्यामध्ये विभागप्रमुख व उपायुक्त म्हणून शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. खडकपूरा येथील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण पथकातील जेसीबी चालकाला जमावाकडून बेदम मारहाण झाली. संपूर्ण पथकावर हल्ला झाला. वातावरण तणावपूर्ण झाले होते; मात्र त्यानंतर उपायुक्त संधू यांनी दुसऱ्या दिवशी अतिरिक्त पोलीस फौजफाट्यासह ती कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. या कारवाईदरम्यान लाठीचार्ज पण झाला; अशाही परिस्थितीत खंबीरपणे उभे राहत अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वी केली. दोषींवर त्याच दिवशी गुन्हाही दाखल करण्यात आला. या सर्व प्रकरणात महापालिकेची खंबीर भूमिका पुढे आली.

शहरातील नमस्कार चौक ते एमजीएम कॉलेज दरम्यानचे अतिक्रमण यशस्वीपणे हटवले. ज्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याचे रखडलेले काम पूर्णत्वास जाऊ शकले. गेल्या १० वर्षांपासून कौठा भागात पद्मजा सिटीसमोरील सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा ताब्यात घेण्यात आली. परिणामी, आता संबंधित विभागाचे रस्त्याचे काम सुरू झाले आहे. मयूर विहार येथील रस्त्याचा प्रश्नही न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रस्ता सुस्थितीत करण्यात आला. महापौर कविता मुळे यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत संपूर्ण नांदेड शहरात अनाधिकृत बॅनरविरोधात १५ गुन्हे दाखल केले आणि शहर ‘अनाधिकृत बॅनरमुक्त’ केले. या सर्व कामगिरीच्या बळावर संधू यांनी ‘ऑफिसर ऑफ द मंथ’ आणि ‘ऑफिसर ऑफ द इयर’ हे दोन्ही पुरस्कार पटकावले आहेत. विशेष म्हणजे संधू यांनी आपल्या उत्कृष्ट व प्रभावी कार्यशैलीच्या बळावर हे दोन्ही बहुमान दोन वेळा पटकावण्याचा मान मिळवला आहे. उपायुक्त स. अजीतपालसिंघ संधू यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

याच कार्यक्रमात माहे मे मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ऑफिसर ऑफ द मंथ हा पुरस्कार कनिष्ठ अभियंता रविंद्र सरपाते यांना प्रदान करण्यात आला तर एम्प्लॉयी ऑफ द मंथसाठी माहे मेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लेखा विभागातील वरिष्ठ लिपिक स.सतपालसिंग कोल्हापुरे यांची निवड करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच माहे जूनमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ऑफिसर ऑफ द मंथ हा पुरस्कार क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे यांना प्रदान करण्यात आला तर एम्प्लॉयी ऑफ द मंथ साठी माहे जूनमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माहिती व तंत्रज्ञान विभागातील कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर मंजू व्यास आणि स्वच्छता विभागातील स्वच्छता निरीक्षक प्रियंका एंगडे यांची संयुक्तपणे निवड करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे माहे जुलैमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ऑफिसर ऑफ द मंथ हा पुरस्कार वैद्यकीय अधिकारी डॉ.माधुरी मग्गिरवार यांना प्रदान करण्यात आला तसेच एम्प्लॉयी ऑफ द मंथ साठी माहे जुलैमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लेखा विभागातील वरिष्ठ लिपिक निलेश शातलवार यांची निवड करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार व सन्मान झाल्याबद्दल उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधितांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!