क्राईम

नांदेडमध्ये नायब तहसीलदारावर वाळू माफियांचा हल्ला

वाडी पाटी येथे घडलेला प्रकार, दगडफेक करणाऱ्या एकास अटक

नांदेड –  जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात पोलीस प्रशासनाने वाळू माफियांविरुद्ध कारवाई सुरू केली असली, तरी शनिवारी रात्री नवीन नांदेडातील वाडी पाटी येथे नायब तहसीलदाराच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला चढवला. विशेष म्हणजे हा हल्ला पोलिसांच्या उपस्थितीत झाला.  रविवारी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा वाळूमाफियानी डोके वर काढले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील वाळू घाटांचा लिलाव प्रलंबित आहे. असे असतानाही थेट मोठमोठ्या बोटीद्वारे अनेक ठिकाणी खुले आम वाळू उपसा सुरूच आहे. राज्यात महसूल मंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीस यंत्रणेने वाळू माफियांविरुद्ध कारवाई सुरू केली असली, तरी त्यांची मुजोरी मात्र कमी झाली नाही. सिडको, सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी कारवाया केल्या असल्या, तरी लिंबगाव, मुदखेड, नायगाव, नांदेड, किनवट, हिमायतनगर, माहूर, नाळेश्वर, राहटी, शंखतीर्थ आदी भागासह विष्णुपुरी प्रकल्पातही थेट पंपाद्वारे उपसा सुरू आहे.

जिल्ह्यात राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाळू व्यवसायात आपली गुंतवणूक केल्याने कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे कारवाया करताना प्रशासनही हतबल होत आहे. पोलीस विभागाने शनिवारी रात्री नांदेडचे नायब तहसीलदार स्वप्नील दिग्गलवार हे आपल्या पथकासमवेत वाडी पाटी येथे कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात वाळूमाफिया एकत्र आले.  यात काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता. या पथकावर वाळू माफियांनी थेट दगडफेक केली. पथकात दोन तलाठी, कोतवाल व पोलीस कर्मचारीही होते. दगडफेक केल्यानंतर संंबंधित वाळू माफियांनी पथकाने पकडलेला हायवा पळवून नेला. ही हायवा गाडी लातूर जिल्हा पासिंगची होती.

शहरातील असर्जन, विष्णुपुरी, भनगी भागात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत आहे. त्याच्या तक्रारी आल्यानंतर कारवाई करण्यासाठी हे पथक गेले होते. या हल्ल्यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. घडलेल्या प्रकारानंतर नायब तहसिलदार स्वप्नील दिग्गलवार यांनी ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. तेेथे तक्रार दिल्यानंतर दीपक पाटील सूर्यवंशी व इतर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. हायवा गाडी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दिली.

ही तर संघटीत गुन्हेगारी…शनिवारी झालेल्या घटनेत आमच्या जीविताला धोका झाला नाही. आम्ही दगडफेकीतून वाचलो. कारवाई करण्यासाठी गेलेलो असताना जवळपास ८० ते १०० जणांचा जमाव अचानक तेथे जमला. त्यांनी हिंसक भूमिका घेत कारवाईस विरोध केला. याबाबत रितसर तक्रार नोंदवली असल्याचे नांदेड तहसीलचे नायब तहसीलदार स्वप्नील दिग्गलवार यांनी सांगितले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!