क्राईम

प्रक्षोभक, अश्लील वक्तव्य केल्याप्रकरणी नांदेडमध्ये माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेविरुद्ध गुन्हा दाखल

वर्गीकरण समर्थनार्थ नांदेडमध्ये काढलेल्या मोर्चात लक्ष्मण ढोबळेने केले होते अश्लील वक्तव्य, सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई गायकवाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल 

नांदेड – नांदेडमध्ये वर्गीकरण समर्थनार्थ सकल मातंग समाजाच्या वतीने काढलेल्या मोर्चात माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेने केलेल्या प्रक्षोभक आणि अश्लील वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करत सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई गायकवाड यांनी ढोबळेविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पोलीस अधीक्षकांचीही त्यांनी भेट घेतली होती. अखेर नांदेड पोलिसांनी माजी मंत्री ढोबळेविरुद्ध प्रक्षोभक आणि अश्लील वक्तव्य केल्याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेडमध्ये १३ सप्टेंबर रोजी सकल मातंग समाजाच्या वतीने वर्गीकरणाच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापुढे झालेल्या सभेमध्ये माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेने प्रक्षोभक वक्तव्य करताना अनुसूचित जातीतील महार समाजातील महिला, अल्पवयीन मुलीविरुद्ध लैंगिक अत्याचार करण्यास प्रवृत्त करणारे जातीय आणि लैंगिक स्वरूपाचे अपमानास्पद वक्तव्य केले होते. सदर वक्तव्याला सार्वजनिक मंचावरून उपस्थित व्यक्तींनी दिलेल्या समर्थन प्रोत्साहनाचीही चौकशी करून ढोबळेसह मंचावरील इतर वक्त्याविरुद्धही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई गायकवाड यांनी १८ सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती.

या तक्रारीची दखल घेत नांदेड पोलिसांनी २१ सप्टेंबर रोजी माजी मंत्री ढोबळेविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात अंजलीताई गायकवाड यांच्या तक्रारीवरून प्रक्षोभक आणि अश्लील वक्तव्य केल्याप्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीत मातंग समाजाने काढलेल्या उपवर्गीकरणासंबंधाने मोर्चातील भाषणामध्ये माजी मंत्री ढोबळे याने महार जातीच्या बायकांवर लाईन मारा म्हणजे त्या आपल्याला बाप म्हणतील तसेच महार फार माजलेत असे भडकाऊ भाषण केले होते.

दरम्यान, याच दिवशी नांदेडमध्येच शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटनाही घडली होती. यामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ढोबळे याचे मोर्चातील भाषण आणि त्याच दिवशी झालेला अत्याचाराचा गुन्हा यामध्ये काही संबंध आहे का? याचा तपास करावा अशी मागणीही गायकवाड यांनी केली होती. ढोबळेच्या भाषणाने समाजात तेढ निर्माण झाली भाषणामध्ये अश्लील भाषा वापरले असे आरोप करण्यात आले होते. एकूणच या प्रकरणाचे गांभीर्य पाहता नांदेड पोलिसांनी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास वजीराबादचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दुसरीकडे माजी मंत्री ढोबळेच्या नांदेडमधील भाषणानंतर आंबेडकरी चळवळीचे नेते सुरेशदादा गायकवाड यांनीही ढोबळेविरुद्ध वैचारिक लढाईला सुरुवात केली. ढोबळेचा इतिहास त्यांनी समाज माध्यमावर स्पष्टपणे मांडला. सुरेशदादा यांनी समाज माध्यमावर ढोबळे तसेच त्याच्या समर्थकांसाठी काही प्रश्नही उपस्थित करून त्याची उत्तरे वैचारिक स्वरूपात देण्याचे आव्हान दिले होते. त्याचवेळी ढोबळेने आता आगामी काळात आपली वक्तव्य थांबवावेत , असा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!