अपघात

श्री विसर्जनादरम्यान विष्णूपुरीत बुडालेल्या दुसऱ्या तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडला 

सोमवारी सकाळी सहा वाजेपासूनच सुरू केली होती शोध मोहीम, एनडीआरएफलाही केले होते पाचारण, दुसऱ्या एका घटनेत श्री विसर्जन बंदोबस्त पार पाडून परतणाऱ्या होमगार्डचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू

नांदेड – वाडी येथील मातोश्री कॉलेजमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या दोन तरुणांचा रविवारी दुपारी विष्णूपुरी येथे काळेश्वर मंदिर परिसरात गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला होता. एका तरुणाचा मृतदेह सोमवारी सायंकाळी सापडला होता. यातील दीपक सोळुंके या दुसऱ्या तरुणाचा मृतदेह आज सोमवारी सकाळी दहा वाजेदरम्यान सापडला आहे. हे दोन्ही तरुण श्री गणेश विसर्जनासाठी आले असताना पोहण्यासाठी नदीत गेले होते. त्यात दोघेही बुडाले. रविवारी सायंकाळी जीवरक्षक दलाने बजरंग येडूरे या १८ वर्षीय तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला होता.

श्री गणेश विसर्जनासाठी गेलेल्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या देगलूर तालुक्यातील किनी येथील बजरंग बिरू येडुरे आणि मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथील दीपक मारुती सोळुंके या दोन तरुणांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. देगलूर तालुक्यातील किनी येथील बजरंग बिरू येडुरे याचा मृतदेह शोधण्यात जीवरक्षक दलाला यश आले होते. मात्र दीपक मारुती सोळुंके याचा मृतदेह रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत सापडला नव्हता. सोमवारी सकाळी ६ वाजेपासूनच शोध घेण्यात येत होता. जवळपास तीन ते साडेतीन तासानंतरही मृतदेह आढळत नसल्याने प्रशासनाकडून एनडीआरएफला पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एनडीआरएफच्या पथकाला पाचारणही करण्यातही आले होते; मात्र ही टीम पोहोचेपर्यंत जीवरक्षक दलाने सकाळी दहा वाजता दीपक सोळंकेचा मृतदेह शोधला. त्याचे नातेवाईक रात्रीपासून काळेश्वर येथे थांबले होते. मृतदेह सापडताच नातेवाईकांनी एकच शोकाक्रोश केला. साडेदहा वाजता दीपक सोळंकेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

विसर्जन बंदोबस्त करून परतणाऱ्या होमगार्डचा अपघातात जागीच मृत्यू…श्री गणेश विसर्जन विसर्जनासाठी विसर्जनाचा बंदोबस्त पार पाडून घराकडे परतणाऱ्या एका होमगार्डचा दुचाकी अपघातात रविवारी सायंकाळी उमरी तालुक्यातील हिरडगाव शिवारात जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील शिक्षक दांपत्यही गंभीर जखमी झाले आहे. उमरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले होमगार्ड संदीप संभाजी पिंगळे, वय ३२ वर्षे, रा. सोमठाणा, ता. उमरी यांना रविवारी मंडाळा येथे गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांची बंदोबस्त ड्युटी लागली होती. हा बंदोबस्त पार पाडून संदीप पिंगळे हे परत येत असताना हिरडगाव शिवारात त्यांच्या दुचाकी आणि एका शिक्षक दाम्पत्याच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये होमगार्ड संदीप पिंगळे हे जागीच ठार झाले तर दुसऱ्या दुचाकीवरील शिक्षक राजेश बालाजी जाधव आणि त्यांच्या पत्नी उज्वला राजेश जाधव दोघे रा. येडाळा, ता. उमरी हे दोघे या अपघातात गंभीर जखमी झाले. हे दोघेही जिल्हा परिषदेच्या तळेगाव शाळेवर कार्यरत आहेत. स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्यांना उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे हलविण्यात आले आहे. होमगार्ड म्हणून कार्यरत असलेले संदीप पिंगळे हे अत्यंत मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष म्हणून परिचित होते. त्यांच्या अकाली जाण्याने सोमठाणा गावावर आणि पोलीस दलात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, चार भाऊ आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे गणेश विसर्जनाला गालबोट लागले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!