
नांदेड – जनावरे घेऊन जात असल्याच्या संशयावरून आयशर ट्रकचा पाठलाग करून त्या ट्रक चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना बिलोली तालुक्यातील कार्ला फाटा येथे रविवारी सायंकाळी घडली. विशेष म्हणजे, वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये जनावरे नव्हे, तर लसूण असल्याचे समोर आले. या प्रकरणी बिलोली पोलिसांनी ७ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मंदसौर (मध्यप्रदेश) येथील वाहनचालक विजेश रतनलालजी बामनिया (वय २९) हे वाहन क्रमांक आरजे-०९ जेई-७८७४ मधून लसूण घेऊन मंदसौरहून हैदराबादकडे जात होते. बिलोली टोलनाक्याजवळ काही तरुण हातात लोखंडी रॉड व लाकडी दांडके घेऊन थांबल्याचे पाहून चालकाने भीतीने वाहन पुढे नेले. त्यानंतर चार मोटारसायकलींवरून तरुणांनी पाठलाग करून कार्ला फाटा येथील आरटीओ चेकपोस्टजवळ वाहन अडविले. तेथे चालकाला वाहनाबाहेर काढून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात केली. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
या मारहाणीत चालकाच्या गळ्यावर, पोटावर, कानावर, तोंडावर व डोक्यावर दुखापत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी चालकास संदीप चांदु गायकवाड व प्रकाश लक्ष्मण गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांनी ऑटोने बिलोली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर डॉ.एम.बी.आयनेले यांनी पुढील उपचारासाठी नांदेडला जाण्याचा सल्ला दिला. या प्रकरणी ट्रक चालक विजेश बामनिया यांच्या तक्रारीवर अविनाश डोपोड (बिलोली), लक्ष्मण मारोती इबितवार, श्रावण इबितवार, देविदास शेकरोड (कासराळी), राजेश्वर सुरेश देशमुख (बाभळी), योगेश उमाकांत कादरकुंटे (कार्ला), संदीप गादगे (बिलोली) व इतर तरुणांविरुद्ध कलम १०९, १२७, १८९, १९०, २९६, ३५१(२), ३५२, १३५ आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय जाधव करीत आहेत. जमलेल्या तरुणांनी वाहनचालका रस्त्यावर चालकाला अमानुषपणे मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. मारहाण करण्या-यांची गय केली जाणार नसल्याचे उपविभागीय अधिकारी श्याम पानेगांवकर यांनी सांगितले.



