
नांदेड – नांदेड जिल्ह्यात अल निनोच्या प्रभावामुळे अपुरा पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील नदी-नाले कोरडे आहेत. त्यासह वेगवेगळे तलावही तळालाच आहेत. श्री विसर्जनाला अवघे तीन दिवस उरलेले असताना आता शहरातील काही गणेश मंडळांनी बसवलेल्या १२ ते २५ फुटाहून अधिक उंचीच्या श्री मूर्तींचे विसर्जन करायचे कसे? हा प्रश्न पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अशा गणेश मंडळांना आवाहन करताना प्रतिकात्मकरित्या श्रींचे विसर्जन करावे, असे आवाहन केले आहे.
विघ्नहर्ता गणरायाचे १५ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आगमन झाले. आता विसर्जनासाठी तीन दिवसांचा कालावधी उरला आहे. या परिस्थितीत विसर्जनाची संपूर्ण तयारी प्रशासकीय पातळीवर केली जात आहे. कृत्रिम तलावासह निर्माल्य संकलन, रस्ते, दिवाबत्ती यासाठी महापालिकेतकडून व्यवस्था केली जात आहे; तर पोलीस दलाच्या वतीने बंदोबस्ताचा आराखडा अंतिम केला जात आहे. नांदेड जिल्ह्यात शहरी भागात जवळपास दीड हजार तर ग्रामीण भागात ४ हजार गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे जवळपास ५०० गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ग्रामीण भागातील तंटे आणि मतभेद मिटून एकोपा वाढीस लागावा यासाठी पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे स्पष्ट झाले आहे. डीजे मुक्तीचाही आदेश काढण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मोठ्या आनंदात आणि उत्साहात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे; परंतु नांदेड शहरातील मोठ्या श्री मूर्तीच्या विसर्जनांचा प्रश्न पहिल्यांदाच उद्भवला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. नांदेडमध्ये मंगळवारी खुद्द जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी प्रत्यक्ष किवळा येथील तलावाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान मोठ्या विद्युत वाहिन्यांचा प्रश्न पुढे आला आहे. जवळपास १२ ते १४ फुटाहून अधिक उंचीच्या मूर्ती येथून नेताना विद्युत वाहिन्यांचा धोका आहे. अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथील तलावाचा पर्यायही उपलब्ध आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी प्रतीकात्मक विसर्जन करण्याचा नवा पायंडा पाडण्याची गरज जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अशा गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या विसर्जन सोहळ्यात आपण स्वतः येऊन आरती करू आणि प्रतिकात्मक विसर्जन करण्यास प्रोत्साहन देऊ असेही जिल्हाधिकारी कर्डिले यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या आवाहनाला मोठ्या गणेश मंडळाचे पदाधिकारी कसे प्रतिसाद देतात, याकडेही लक्ष लागले आहे. नांदेड शहर व परिसरात जवळपास ४६ गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांनी १२ ते २५ फुटांहून अधिक उंचीच्या गणेश मूर्ती बसविल्या आहेत. अर्धापूर तालुक्यातील येळेगाव आणि लोहा तालुक्यातील किवळा येथे मोठ्या मूर्तींच्या विसर्जन करता येऊ शकतील; मात्र २५ सप्टेंबर रोजी पावसाचा इशारा असल्याने गणेश मंडळांना तसेच यंत्रणांना अडचणी येऊ शकतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नांदेड दक्षिण, उत्तरच्या आमदारांनी घेतली बैठक..! शुक्रवारी होणाऱ्या श्री विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोंढारकर आणि नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी मंगळवारी महापालिकेत बैठक घेतली. आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत गणेश विसर्जनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात नांदेडच्या दोन्ही आमदारांनी कोणत्याही प्रकारचे आवाहन गणेश मंडळांना केले नाही अथवा स्पष्ट अशी भूमिका मांडली नाही. या प्रश्नावर प्रशासकीय यंत्रणांनाच तोडगा काढावा लागणार आहे. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन गणेश मंडळांना आवाहन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील पर्यावरण रक्षण आणि अपुऱ्या जलसाठ्याचा विषय लक्षात घेऊन श्री गणेश स्थापनेपूर्वी मोठ्या मूर्ती ऐवजी लहान श्री मूर्ती स्थापित कराव्यात असे आवाहन राजकीय नेते, पदाधिकारी तसेच प्रशासनाकडूनही करणे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. परिणामी आता मोठ्या मूर्तींचा विसर्जनाचा प्रश्न जटिल बनला आहे.
नांदेड दक्षिण, उत्तरच्या आमदारांनी घेतली बैठक..!


