क्राईम

नांदेड पोलीस परिक्षेत्रात महाराष्ट्र दिनापासून अवैध व्यवसाय विरोधी अभियान 

पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर, अवैध धंदे चालविणाऱ्यावर मोक्का लावण्याचेही आदेश..!

नांदेड – परिक्षेत्रात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी सहा मास रेड झाल्या. १ हजार २७० गुन्हे दाखल करीत ७२ लाख २४ हजार ८०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र अजूनही परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध दारू, मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी, क्रिकेट बेटिंग, गुटखा, अंमली पदार्थ, वेश्या व्यवसाय, वाळू उपसा व वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक आदी अवैध धंदे सुरूच असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे १ मे या महाराष्ट्र दिनापासून नांदेड पोलीस परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये अवैध व्यवसाय विरोधी अभियान सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केली आहे. त्यामुळे आता परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी होणाऱ्या कारवायांना वेग येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता  उपमहानिरीक्षक उमाप हे ॲक्शन मोडवर आल्याचे स्पष्ट होत आहे

नांदेड जिल्ह्यासह पोलीस परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यात अवैध दारू, मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी, क्रिकेट बेटिंग, गुटखा, अमली पदार्थ व्यवसाय, वाळू उपसा आणि वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे या मोहिमेची गरज लक्षात घेता उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त निवडला आहे. १ मे ते ३१ मे दरम्यान नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी अभियान – १ हाती घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनापासून नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चारही जिल्ह्यात अवैध व्यवसाय विरोधी अभियान राबविले जाणार आहे.

या मोहिमेत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, अंमलदार यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षक हे सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष पोलीस पथकेही कारवाईत सहभागी होणार आहेत. संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे अवैध व्यवसाय विरोधी कारवायांवर देखरेख ठेवणार आहेत. विशेष म्हणजे सातत्याने अवैध व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या व्यावसायिकाविरुद्ध तडीपारी, एमपीडीए व प्रकरण परत्वे मोक्का कायद्याखालीदेखील कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश उमाप यांनी दिले आहेत.

नागरिकांनीही आपल्या भागातील अवैध व्यवसायाची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाच्या nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर द्यावी. ज्यातून त्या त्या भागातील अवैध व्यवसायाचा बीमोड करण्यासाठी पोलिसांची मदत होईल, त्यामुळे नागरिकांनीही अवैध धंद्यांची माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक उमाप यांनी केले आहे.

नांदेड पोलीस परिक्षेत्रातील विशेष पथके गुंडाळली…नांदेड पोलीस परिक्षेत्राचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यात विशेष पोलीस पथके नियुक्त करून अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले होते. या विशेष पथकांच्या कारवायाची धसकी सर्व जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांनी घेतली होती. तशा कारवायाही विशेष पथकाने प्रारंभी केल्या होत्या मात्र पुढे विशेष पथकातीलच काही पोलीस अधिकारी थेट अवैध व्यवसायिकाकडून रक्कम उकळताना रंगेहात सापडले होते. नांदेड जिल्ह्यातील हा प्रकार घडल्यानंतर विशेष पथकांचे महत्त्व संपले होते. पुढे ती पथके पोलीस अधीक्षकांनी गुंडाळल्यातच जमा झाले. आता महाराष्ट्र दिनापासून परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यात अवैध व्यवसाय विरोधी अभियान किती प्रभावी ठरते हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

नांदेड पोलीस परिक्षेत्रात विधानसभा निवडणुकीदरम्यान अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यात मासरेड झाल्या. विधानसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या सहा मास रेडमध्ये नांदेड जिल्ह्यात ४१२ गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये आरोपींची संख्या ४१९ इतकी आहे; तर पोलिसांनी या कारवाईदरम्यान १८ लाख ४७ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. परभणी जिल्ह्यात २८० गुन्हे २८३ आरोपीवर दाखल करण्यात आले आहेत. १३ लाख ७६ हजार ६३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हिंगोली जिल्ह्यात १६६ गुन्हे दाखल करत १७७ जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईदरम्यान ५ लाख ४३ हजार ४१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर लातूर जिल्ह्यात ४१२ गुन्हे दाखल करताना ३४७ आरोपीविरुद्ध कारवाई केली. या कारवाईदरम्यान ३४ लाख ५७ हजार ६५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदेड परिक्षेत्रात ७२ लाख २४ हजार ८०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करत १ हजार २२६ जणांविरुद्ध १ हजार २७० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!