नांदेड – मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर उत्कृष्ट कार्याबद्दल नांदेडला दुहेरी बहुमान मिळाला आहे. नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालय राज्यात दुसऱ्या स्थानी तर नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालय पाचव्या स्थानावर राहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या १०० दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाच्या निकालाची घोषणा महाराष्ट्र दिनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेदरम्यान कार्यालयीन मूल्यमापन नुकतेच करण्यात आले. हे मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक यामध्ये नांदेड पोलीस पोलीस परिक्षेत्र कार्यालयाला ६१.१४ गुण प्राप्त झाले आहेत. राज्यात कोकण परिक्षेत्र पहिल्या स्थानी तर नांदेड पोलीस परिक्षेत्र दुसऱ्या स्थानी राहिले आहे.
नांदेड पोलीस परिक्षेत्राचे उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी शंभर दिवसाच्या कार्यकाळात वेगवेगळ्या सुधारणा करताना पोलीस परिक्षेत्रातील सर्व ९१ पोलीस ठाणे ऑनलाईन पद्धतीने जोडले होते. नांदेड पोलीस परिक्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच कार्यालयाची स्वतंत्र वेबसाईट त्यासोबतच ई टपाल प्रणाली आणि क्राईम इन्वेस्टीगेशन मॉनिटरिंग प्रणाली कार्यान्वित केली आहे. यामुळे पोलिसांच्या प्रशासकीय कामाला गती आली. सामान्य माणसालाही घरात बसूनच पोलिसांकडे आपल्या तक्रारी करता येत आहेत.
पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी कार्यान्वित केलेल्या नवीन ऑनलाईन प्रणालीद्वारे सर्व ९१ पोलीस ठाण्यांसह पोलीस अधीक्षक कार्यालय, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलीस कार्यालयासह प्रत्येक ठाणे या प्रणालीद्वारे जोडण्यात आले आहे. पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील जुन्या संचिकांचे निर्लेखन करताना तब्बल चार ट्रक संचिका निर्लेखित केल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांमध्ये नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नांदेड जिल्ह्याचा राज्यात पाचवा क्रमांक राहिला आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या या सुधारणा कार्यक्रमांमध्ये नांदेड जिल्ह्यात ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणे, वंचितापर्यंत प्रशासन पोहोचविणे, डिजिटल सोल्युशन, केंद्राचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावणे यासह ऑफिसमध्ये रेकॉर्ड अद्यावत ठेवणे या बाबींची चोखपणे अंमलबजावणी केली आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यमंत्री १०० दिवसाच्या कार्यक्रमात मराठवाडा विभागात पहिल्या स्थानी राहिले होते. महाराष्ट्रातील सहा विभागीय कार्यालयांतर्गत असलेल्या जिल्ह्यातून नांदेडला पाचवा क्रमांक प्राप्त झाला आहे. वेगळे प्रयोग, शासनाची प्रतिमा वर्धन करणाऱ्या योजना, स्वच्छता आदी सर्व निकषांतून राज्यात नांदेड जिल्ह्याला हा बहुमान प्राप्त झाला आहे



