प्रशासकीय

उमरीचे तत्कालीन तहसीलदार प्रशांत थोरात निलंबित 

निरोप समारंभात खुर्चीवर बसून गाणे भोवले, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अहवालानंतर विभागीय आयुक्तांनी काढले निलंबनाचे आदेश 

नांदेड – उमरी येथे कार्यरत असलेले तहसीलदार आणि बदलीनंतर निरोप समारंभात खुर्चीवर बसून गाणे गाणारे प्रशांत थोरात यांना विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी निलंबित केले आहे. याबाबतचे आदेश शनिवारी सायंकाळी काढण्यात आले आहेत. उमरी येथून प्रशांत थोरात यांची लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे तहसीलदार म्हणून बदली झाली आहे.

उमरी येथील तहसीलदार प्रशांत विश्वासराव थोरात यांची रेणापूर तहसीलदार म्हणून बदली झाली. बदलीनिमित्त ८ ऑगस्ट रोजी उमरी तहसील कार्यालयाकडून त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तहसीलदार प्रशांत थोरात यांनी खुर्चीत बसून गाणे गायल्याचे व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या व्हिडिओवरून सामान्य नागरिक आणि राजकीय पक्षांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया पुढे आल्या होत्या. थोरात यांच्या कृतीमुळे शासनाची प्रतिमा मलिन झाल्याबाबतचा अहवाल नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठवला होता. तहसीलदार थोरात यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवामधील तरतुदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्याची शिफारस त्यांनी केली होती. विशेष म्हणजे नव्याने रुजू झालेल्या उमरीच्या तहसीलदार मंजुषा भगत यांच्या समोरच हा प्रकार सुरू होता. एका महिला अधिकाऱ्यांच्या समोर बसून होणारे अंगवेक्षक निश्चितपणे आक्षेपार्ह होते. भगत या हा सर्व प्रकार निमूटपणे मान खाली घालून पाहत होत्या.

नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालावरून त्या व्हिडिओचे विभागीय आयुक्तांनी अवलोकन केले. थोरात यांच्या कृतीचा व्हिडिओ हा समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला होता. व्हिडिओमध्ये थोरात हे विविध प्रकारचे अंगविक्षेप, हातवारे करत असल्याचे दिसून येत आहे. थोरात यांनी शासकीय कर्मचाऱ्याला अशोभनीय ठरेल असे वर्तन केल्याचे निदर्शने दर्शनास आले. या कृत्यामुळे शासनाची प्रतिमा जनमानसात मलीन झाली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याची असल्याचे विभागीय आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. त्याचवेळी सदरची वर्तवणूक ही अत्यंत बेजबाबदार आणि शासकीय अधिकाऱ्यास अशोभनीय असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रशांत थोरातविरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमातील प्राप्त आदेशानुसार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सध्याचे रेणापूर येथील तहसीलदार प्रशांत थोरात यांना १६ ऑगस्ट रोजी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!