नांदेड जिल्हा

नांदेडमध्ये होणार ५०० खाटांचे रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाच्या श्रेयासाठी चढाओढ..!

सत्ताधारी नेत्यांमध्येच समाज माध्यमावर रंगला कलगीतुरा..! आपल्यामुळेच रुग्णालय झाल्याचा करण्यात आला दावा, महापालिकेचे पदाधिकारीही नेत्यांच्या समर्थनार्थ उतरले मैदानात 

नांदेड – नांदेड शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ५०० खाटाच्या रुग्णालय मंजुरीवरून नांदेड जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांमध्ये आता चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. या रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाचे श्रेय भाजपच्या दोन खासदारासह नांदेड दक्षिणच्या एका आमदारानेही घेतले आहे. तर भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनीही हा प्रश्न आपण विधानसभेत मांडला होता असा दावा केला आहे. आपल्याच प्रयत्नातून या रुग्णालयाला मंजुरी मिळाल्याचा दावा छायाचित्रांसह या नेत्यांनी समाजमाध्यमावर केला आहे. त्यामुळे ‘रुग्णालय एक दावेदार अनेक’ अशीच परिस्थिती या रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनावरून झाली आहे.

नांदेड येथे प्रस्तावित ५०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची उभारणी ‘प्रगती प्रकल्पां’तर्गत एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून करण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. या रुग्णालयासाठी आवश्यक ५९४ पदांच्या आकृतीबंधालाही मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला. नांदेड शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे ५०० खाटांच्या रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. रुग्णालयाच्या प्रभावी संचालनासाठी मंजूर आकृतीबंधानुसार सर्व ५९४ पदे नव्याने निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या नवनिर्मित पदांच्या वेतनासाठी ३१ कोटी २५ लाख रुपयांचा अपेक्षित खर्च मंजूर करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘प्रगती’ प्रकल्पाअंतर्गत नांदेड येथे आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) अर्थसहाय्यातून ५०० खाटांचे नवीन जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे.

राज्य शासनाने नांदेडमधील ५०० खाटांच्या या रुग्णालयास मंजुरी दिली आहे; परंतु या रुग्णालयाच्या मंजुरीचे श्रेय माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्यासह नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर यांनी उचलले आहे. आपल्या प्रयत्नातूनच या रुग्णाला आला मंजुरी मिळाल्याचा दावा या नेत्यांनी आपल्या समाज माध्यमावरील पोस्टद्वारे केला आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी २४ तासापूर्वी या रुग्णालयाच्या मंजुरीबाबत समाज माध्यमावर माहिती देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांचे आभार मानले. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकारातून नांदेड येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ते ५०० खाटांचे करण्याचा शासन निर्णय यापूर्वीच जारी झाला होता. या प्रकल्पासाठी निधीही उपलब्ध करून द्यावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे नमूद केले आहे.

नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने प्रसिद्ध केलेल्या ‘विकसित नांदेडचा संकल्पनामा’ या घोषणापत्रातही या रुग्णालयाच्या उभारणीचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे या रुग्णालयाचे खरे श्रेय माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनाच असल्याचे महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले , सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे, सभापती सदिच्छा सोनी यांनी केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे दुसरे राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनीह जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनामुळे नांदेडच्या आरोग्य व्यवस्थेला ऐतिहासिक ताकद मिळाली असल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विशेष आभार मानले असल्याची पोस्ट समाज माध्यमावर टाकली आहे. या दूरगामी निर्णयाबद्दल बुधवारी मुंबईत राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रत्यक्ष भेट घेतली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रस्तावित रुग्णालयात हृदयरोग, कर्करोग, स्ट्रोक व डायलिसिससाठी विशेष सुविधा राहणार आहे. नांदेड व संपूर्ण मराठवाड्याच्या आरोग्य विकासासाठी आपला पाठपुरावा असाच निरंतर सुरू राहील असेही खासदार डॉ. गोपछडे यांनी म्हटले आहे.

नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर यांनी नवीन ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. “नांदेडच्या जनतेला अत्याधुनिक आणि सक्षम आरोग्यसेवा मिळावी, यासाठी ५०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न शासनदरबारी सातत्याने मांडला. आता रुग्णालयाला मंजुरी आणि ५९४ नवीन पदांची निर्मिती झाल्याने नांदेडच्या आरोग्यसेवेला नवी दिशा मिळणार आहे. पुढील टप्प्यात रुग्णालयाचे काम वेगाने सुरू होण्यासाठीही पाठपुरावा सुरू ठेवू,” असे आमदार आनंदराव बोंढारकर यांनी सांगितले. रुग्णालयाच्या बांधकामासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता, निधी तसेच अत्याधुनिक आरोग्य सुविधांसाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा केल्याने या प्रस्तावाला गती मिळाली. शासनाने ५०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयाला मंजुरी देत ५९४ नवीन पदांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयाचे ३०० वरून ५०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली होती. विद्यमान आंतररुग्ण विभागाची इमारत वापरण्यास अयोग्य असल्याने त्याठिकाणी नवीन बहुमजली रुग्णालयाची इमारत उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. प्रगती प्रकल्पातून केवळ रुग्णालयाची नवीन इमारत उभारली जाणार नसून आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. हृदयरोग, स्ट्रोक, दीर्घकालीन मूत्रपिंड विकार, कर्करोग, मानसिक आरोग्य आणि पॅलिएटिव्ह केअर यांसारख्या उपचारांसाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे.

दरम्यान, भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आ. श्रीजया चव्हाण यांनी १७ मार्च २०२६ रोजी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून ५०० खाटांच्या नवीन जिल्हा सामान्य रुग्णालयाला आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली होती. त्या लक्षवेधीला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी ‘एडीबी’अंतर्गत कामांच्या पुढील प्रस्तावात या रुग्णालयाच्या उभारणीचा समावेश केला जाईल, असे जाहीर केले होते. त्यामुळे त्यांचाही या रुग्णालय मान्यतेमध्ये वाटा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

एकूणच नांदेडमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या श्रेणी वर्धनावरून नांदेडमध्ये नेत्यांच्या नेत्यांमध्ये श्रेयासाठी चढाओढ लागली आहे. श्रेय कोणीही घ्या मात्र रुग्णालय लवकर सुरू करा अशी अपेक्षा नांदेडकर व्यक्त करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!