क्राईम

माहूर हत्याकांडात यवतमाळच्या कुख्यात दत्ता मित्रासह स्थानिक गुन्हा शाखेने केला जेरबंद..! 

सोन्याच्या दागिन्यासाठीच आवळला दोन्ही जावांचा गळा, खून करून माहूर तालुक्यातच मारली होती दडी, पुण्याच्या तज्ञाद्वारे संशयितांचे तयार केले होते स्केच

नांदेड – दरोड्याच्या प्रकरणात चार वर्षाची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आल्यानंतर जवळचे पैसे संपले. खून, बलात्कार असे एकापेक्षा एक १४ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात दत्ताला पैसे कुठून मिळवायचे हे काही नवीन नव्हते. सारखणी येथे आपल्या नातेवाईकाकडे आलेल्या दत्ताने आपले सावज हेरले. आपला मित्र गजाननलाही सोबत घेतले आणि माहूर तालुक्यात दोन सख्या जावांचा गळा आवळून सोन्याचे दागिने लंपास केले. पाचुंद्यातील त्या दोन सख्ख्या जावांच्या हत्याकांडाने अवघा नांदेड जिल्हा हादरला होता. या हत्याकांडाचा तपास लावण्याचे मोठे आव्हान नांदेड जिल्हा पोलिसांसमोर उभे होते. ते आव्हान स्थानिक गुन्हा शाखेने यशस्वीरित्या पेलले आहे. माहूर तालुक्यातीलच गंगाजीनगर, सेलू करंजी येथे नातेवाईकाच्या शेतातील आखाड्यावर लपून बसलेल्या दत्ता सुरेश लिंगलवार याला स्थानिक गुन्हा शाखेने सापळा रचून पकडले. त्याच गावातून त्याचा मित्र गजानन गंगाराम येरजवार यालाही पकडले आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या या दमदार कामगिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कौतुक केले आहे.

माहूर तालुक्यातील पाचुंदा येथे अंतकलाबाई अशोक आडागळे वय ५५ वर्षे आणि अनुसयाबाई साहेबराव अडागळे वय ५० वर्षे या दोन जावा २० नोव्हेंबर रोजी शेतात कापूस वेचणी करीत होत्या. त्यावेळी दोघींचाही गळा दाबून त्यांना जीवे मारून त्यांच्या अंगावरील सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेल्याची माहिती माहूर पोलीस ठाण्यात देण्यात आली. या घटनेमुळे माहूर तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, भोकरच्या अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, माहूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, माहूरचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली होती. तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व पोलीस दलाला आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या.

स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी चार पथके नेमून आदिलाबाद, यवतमाळ, माहूर आणि किनवट येथे पाठविण्यात आले होते. आरोपीचा शोध घेण्यासाठी संशयित आरोपीचे व्हिडिओ कॉलिंगद्वारे पुणे येथून तज्ञाद्वारे स्केच तयार करण्यात आले. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रवी वाहुळे, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, त्यांच्या पथकातील अंमलदार आरोपींचा किनवट आणि माहूर उपविभागात शोध घेत होते.

संशयित आरोपीच्या स्केचवरून माहिती घेत असताना २१ नोव्हेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. संशयित आरोपी दत्ता सुरेश लिंगलवार रा. सदोबा सावळी ता. आर्णी जि. यवतमाळ हा गंगाजीनगर सेलू करंजी ता. माहूर येथे नातेवाईकाच्या शेतातील आखाड्यावर लपून बसला आहे. ही खात्रीशीर माहिती मिळताच सापळा रचून दत्ता लिंगलवार वय ३८ याला पकडण्यात आले. त्याची चौकशी करून या प्रकरणात सहभागी असलेला त्याचा मित्र गजानन गंगाराम येरजवार वय ४१ वर्ष रा. गंगाजीनगर करंजी ता. माहूर यालाही गावातच पकडण्यात आले. या दोघांनीही गुन्हा कबूल केला असून गुन्ह्यात वापरलेली एक मोटार सायकल व दोन मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या दोघांनाही माहूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून मुद्देमालाबाबत आता अधिक तपास केला जात आहे. या प्रकरणात नांदेड जिल्हा पोलिसांना यवतमाळ पोलिसांनीही चांगले सहकार्य केले.

हा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे उपनिरीक्षक दासरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक गिरी, गुंडेराव करले, दारासिंग राठोड, मोहन हाके, ज्ञानोबा कवठेकर, देविदास चव्हाण, दिलीपकुमार चंचलवार, मोतीराम पवार, सिद्धार्थ सोनसळे, रितेश कुलथे, धम्मा जाधव, मारुती मुंडे, सायबर सेलचे दीपक ओढणे आदींनी परिश्रम घेतले.

कुख्यात दत्तावर यवतमाळमध्ये १४ गुन्हे दाखल…या प्रकरणातील प्रमुख आरोपी दत्ता सुरेश लिंगलवार हा अटल गुन्हेगार आहे. त्याच्यावर यवतमाळ जिल्ह्यात १४ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खून, बलात्कार, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे समाविष्ट आहेत. त्याला दरोड्याच्या एका प्रकरणात चार वर्षे शिक्षाही झाली आहे. शिक्षा भोगून तो तुरुंगातून बाहेर आला होता. सारखणीतील एका नातेवाईकाकडे तो काही दिवसापासून राहत असताना त्याने २१ नोव्हेंबर रोजी आपल्या मित्राला घेऊन पाचुंद्यातील हे हत्याकांड घडवले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!