
नांदेड – राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेडमध्ये महापालिकेच्यावतीने २२ मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिली.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व महापालिका क्षेत्रात वार्ड समिती गठित करण्याचे निर्देश राज्य स्तरावरून प्राप्त झाले आहेत. त्यानुसार या योजनेचे नांदेड वाघाळा शहर महापालिका कार्यक्षेत्रात अर्ज स्वीकारण्यासाठी प्रभागनिहाय मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्यामध्ये क्षेत्रिय कार्यालय क्रमांक एक तरोडा सांगवी येथे क्षेत्रीय कार्यालय, राज कॉर्नर, शिवपार्वती मंगल कार्यालय समोर भावसार चौक तरोडा खुर्द, साईबाबा मंदिर चैतन्यनगर तरोडा बु. मुळगाव सांगवी बौद्ध विहार विमानतळासमोर, सांगवी क्षेत्रिय कार्यालय क्रमांक दोन अशोकनगर येथे क्षेत्रिय कार्यालय अशोकनगर पाण्याची टाकी, पशुवैद्यकीय दवाखाना समोरील सीएलसी सेंटर आणि लक्ष्मीनगर आरके फंक्शन हॉल येथे मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
शिवाजीनगर क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत क्षेत्रिय कार्यालय फायर स्टेशन लेबर कॉलनी, मनपा शाळा पिवळी गिरणी डॉ. आंबेडकर नगर व विजयनगर पोलीस चौकीच्या मागे, वजीराबाद क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत क्षेत्रीय कार्यालय रणजीतसिंग मार्केट जुना मोंढा, हनुमान टेकडी परिसर, गांधी पुतळा पाण्याची टाकी एलबीटी कार्यालय, खडकपुरा मनपा वाचनालय, इतवारा क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत इतवारा, क्षेत्रिय कार्यालय रणजीतसिंग मार्केट जुना मोंढा, महापालिका दवाखाना करबला, महापालिका वाचनालय हैदरबाग, महापालिका वाचनालय उमर कॉलनी आणि सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत महापालिका दवाखाना सिडको, मोहन पाटील घोगरे यांचे कॉम्प्लेक्स हडको, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या पाठीमागे, वाल्मिकी धर्मशाळा हनुमान मंदिराजवळ वसरणी आणि तुकाराम संभाजी काकडे यांचे दुकान पेट्रोल पंपाच्या बाजूस रवीनगर कौठा येथे हे मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. या केंद्राचे वार्ड अधिकारी म्हणून क्षेत्रिय अधिकारी काम पाहणार आहेत.
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेत नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागात कालपर्यत ४८ हजारावर अर्ज दाखल झाले आहेत. तसेच जिल्ह्यात प्रत्येक तालुकानिहाय, वार्डनिहाय, गावनिहाय अर्ज भरुन घेण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवर मेळावे, कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत. आता या योजनेत अर्ज भरण्याची सुविधा अत्यंत सुलभ झाली असून शासनाने कागदपत्रातील निकष व अटीमध्ये शिथीलता दिली आहे. त्यामुळे कमीत कमी कागदपत्र व निकषामध्ये या योजनेत सहभागी होता येणार आहे. या योजनेअंतर्गत आता ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
तीन नोडल अधिकाऱ्यांची ही नियुक्ती…या केंद्रावर ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत आणि दुपारी दोन ते रात्री आठ वाजेपर्यंत महिलांकडून अर्ज स्वीकारण्यात येतील. अर्ज भरण्यासाठी महिलांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच नागरिकांनी अर्ज स्वीकृती दरम्यान अडचण निर्माण झाल्यास अतिरिक्त आयुक्त तथा नोडल अधिकारी गिरीश कदम, उपायुक्त अजितपालसिंघ संधू आणि बालविकास प्रकल्प अधिकारी (शहर) विजय बोराटे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.