
नांदेड :- हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा व परिसर सुशोभिकरण कामाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.
नांदेड शहरात महानगरपालिकेच्या वतीने कै.वसंतराव नाईक चौक येथे उभारण्यात आलेल्या या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानी इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे होते. कार्यक्रमास राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार अशोकराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुसिंग महाराज राठोड, आमदार बाबुराव कदम, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी मंचावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी रिमोटद्वारे पुतळ्याचे अनावरण केले. त्यांच्या हस्ते नामफलकाचेही अनावरण करण्यात आले. याप्रसंगी बंजारा समाजाच्यावतीने गृहमंत्री शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचा पारंपारिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने बंजारा समाजाचे नागरिक, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह उपआयुक्त सुप्रिया टवलारे, नितीन गाढवे, स.अजितपालसिंघ संधू, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता विश्वनाथ स्वामी, मुख्य उद्यान अधीक्षक डॉ.मिर्झा बेग, उपअभियंता दिलीप टाकळीकर, सतीश ढवळे, प्रकाश कांबळे, क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, रावण सोनसळे, ग्रंथपाल श्रीनिवास इज्जपवार, जनसंपर्क विभागाचे सुमेध बनसोडे यांची उपस्थिती होती.
हरितक्रांतीचे जनक कै.वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने नांदेड शहरातील कै.वसंतराव नाईक चौक परिसरात उभारला आहे. नऊ फूट उंचीच्या या पुतळ्याचे वजन सुमारे ७०० किलो आहे. पुतळ्याच्या उभारणीसाठी १३ लक्ष ९९ हजार रुपये एवढा खर्च आला आहे. २३२.६० चौ.मी. जागेत या पुतळ्याची उभारणी करण्यात आलेली आहे. या पुतळा उभारणी व सुशोभिकरणासाठी जवळपास ६९ लक्ष रूपयांचा खर्च करण्यात आलेला आहे.