
नांदेड – भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरलेली वंदे भारत एक्सप्रेस नांदेडलाही सुरू करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. नांदेड- मुंबई – नांदेड या प्रवासाचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नांदेडकरांना आता नांदेड – गोवा या मार्गावरील विमानसेवेपाठोपाठ नांदेड – मुंबई या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसने प्रवासाची संधीही लवकरच प्राप्त होणार आहे. त्यामुळे नांदेडकरांच्या दळणवळणाचा मार्ग आता दिवसेंदिवस सुकर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे नांदेड – मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसच्या श्रेयवादासाठीही आता जिल्ह्यातील सत्ताधारी राजकीय नेते सरसावले आहेत. सत्ताधारी दोन राज्यसभा खासदारांसह एका माजी खासदारानेही नांदेडला वंदे भारत सुरू करण्यात आपलाच पाठपुरावा यशस्वी झाल्याचा दावा सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.
रेल्वे बोर्डाने नांदेड- मुंबई- नांदेड वंदे भारत एक्सप्रेससाठी वेळापत्रक प्रस्तावित केले असून, त्याला मंजुरी मिळाल्यानंतर भारताची ही वेगवान व अत्याधुनिक रेल्वे लवकरच नांदेडकरांच्या सेवेत दाखल होईल. रेल्वे बोर्डाच्या प्रस्तावानुसार, वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावेल. नांदेडहून पहाटे ५.०० वा. निघून दुपारी २.२५ ला मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहोचेल, तर मुंबईहून दुपारी १.१० वा. निघून नांदेडला रात्री १०.५० ला पोहोचेल. नांदेडकर प्रवाशांची ही बहुप्रतिक्षित सेवा सुरु होत असल्याबद्दल खा. अशोकराव चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंह बिट्टू यांचे आभार मानले आहेत.
खा. चव्हाण यांनी नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे श्रेय माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिले आहे. त्यांनीच २०२३ मध्ये नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची घोषणा केली होती. त्यांच्या मंत्रीपदाच्या काळातच ही गाडी मुंबईहून जालनापर्यंत सुरू झाली. जालना ते नांदेड दरम्यानच्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर ही गाडी नांदेडपर्यंत धावणार असल्याचे पूर्वनियोजित होते.
गाडी क्र. २०७०५ नांदेडहून मुंबईकडे बुधवार वगळता दररोज सकाळी ५ वाजता रवाना होईल. ती परभणी, जालना, संभाजीनगर, अंकाई, मनमाड, नासिक, कल्याण, ठाणे मार्गे दुपारी २.२५ ला सीएसटी मुंबई ला पोहोचेल. गाडी क्र. २०७०६ मुंबईहून नांदेडकडे गुरुवार वगळता दररोज दुपारी १.१० वाजता निघेल आणि त्याच मार्गाने रात्री १०.५० ला नांदेडला पोहोचेल.या गाडीमध्ये ८ एसी चेअर कार कोच असतील.
राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनीही आपण वर्षभर मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस नांदेडपर्यंत वाढवण्याची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने लावून धरली होती, असे स्पष्ट केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री सरदार रवनीतसिंह बिट्टू यांचे आभार व्यक्त केले आहेत.
नांदेड लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार तथा लोहा कंधार विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तत्कालीन परिस्थितीत वंदे भारत एक्सप्रेस नांदेड येथून सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न केले होते. गृहमंत्री अमित शहा हे नांदेड भेटीवर आले असता त्यांच्याकडेही त्यांनी मागणी केली होती आणि विराट सभेत प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नावाचा उल्लेख करत अमित शहा यांनी नांदेड येथून विमानसेवा आणि वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होईल, असे आश्वासन दिले होते तर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडेही वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याच्या अनुषंगाने चिखलीकर यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले आहे. या रेल्वेमुळे नांदेडच्या विकासाला नवी गती प्राप्त होईल आणि नांदेडकरांना जलदगतीने प्रवास करून मुंबईला लवकर पोहोचता येईल. वंदे भारत एक्सप्रेस नांदेडपर्यंत सोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा , केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आ.चिखलीकर यांनी आभार मानले आहेत.