दळणवळण

नांदेडची विमानसेवा उद्या बुधवारपासून पूर्ववत सुरू होणार …

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती, नांदेडसह लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होणार दूर

नांदेड – नांदेड विमानतळाच्या धावपट्टीवरील खड्ड्यांमुळे २२ ऑगस्टपासून बंद झालेली नांदेडची विमानसेवा १० सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. विमान उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या सर्व दुरुस्त्या झाल्यानंतर या संदर्भात डीजीसीएने नांदेडमधून पुन्हा एकदा उड्डाणाची परवानगी दिल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अधिकृत माहिती देताना स्पष्ट केले आहे.

नांदेड शहरात शहरातील या खोदलेल्या रस्त्यातून वाट काढताना नांदेडमधील वाहनधारकांच्या नाकी नऊ आलेले असतानाच आता नांदेडमधून विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही रनवेवरील खड्ड्यामुळे आपला प्रवास थांबवावा लागला होता. रनवेवरील खड्डे दुरुस्ती गेल्या काही वर्षापासून झाली नसल्यामुळे नांदेडची विमानसेवा २२ ऑगस्टपासून अचानक बंद करण्यात आली होती. ती कधी सुरू होईल याबाबत अनिश्चितताच होती; मात्र नांदेड विमानतळावरील आवश्यक बाबींची दुरुस्ती करून या ठिकाणावरून विमानसेवा सुरू करण्याबाबत तातडीने हालचाली करण्यात आल्या. त्यानुसार आवश्यक ते काम पूर्ण करून १० सप्टेंबरपासून विमानसेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.

२००९ पासून नांदेड विमानतळ सेवा रिलायन्स कंपनीकडे देण्यात आले होती. २०१७ मध्ये नांदेड विमानतळाच्या रनवे दुरुस्तीचे काम झाले होते. रनवेची दुरुस्ती साधारणत: पाच वर्षानंतर व्हावी असे अपेक्षित आहे. मात्र नांदेडच्या विमानतळाचा रनवे २०१७ पासून दुरुस्त झालाच नव्हता. नांदेड विमानतळ रिलायन्सकडून एमएडीसी अर्थात महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडकडे देण्यात आले आहे. हा करार काही दिवसांपूर्वीच झाला आहे. नांदेड विमानतळाची अवस्था बघून एमएडीसीने विमानतळ हस्तांतरणाचा करार काही दिवस पुढे ढकलला होता. मात्र शासनाने हा निर्णय शेवटी घेतला.

नांदेड विमानतळावरून नांदेडसह लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, आदिलाबाद, निजामाबाद या भागातील प्रवासी देशातील विविध भागात प्रवास करीत होते. नांदेडहून पुणे, दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, बंगळुरू या मोठ्या शहरासाठी नियमित विमानसेवा होती या विमानसेवेला चांगला प्रतिसादही मिळत होता. नांदेडहून अहमदाबादमार्गे गुजरातमधील कुबेर येथे जाणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी होती. मात्र अचानक २२ ऑगस्ट रोजी डीजीसीएने दिलेल्या आदेशानुसार नांदेड विमानतळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा नांदेड विमानतळावरून १० सप्टेंबरपासून विमानसेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनीही नांदेडमधून विमानसेवा पूर्ववत सुरू होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.नांदेडच्या श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, डीजीसीएने धावपट्टी पुन्हा वापरण्यासाठी मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, नागरी उड्डयन मंत्री  के. राममोहन नायडू व केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री  मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून धावपट्टी दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण केल्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले आहेत. नांदेडच्या सर्व विमानसेवा बुधवार दि. १० सप्टेंबर २०२५ पासून पूर्ववत होणार असल्याने प्रवाशांची गैरसोय आता दूर होईल असेही ते म्हणाले.

याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले, नागरी उड्डयन महासंचालनालयाने (DGCA) स्थगिती आदेश मागे घेतला आहे. श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे सर्व विमानसेवा दिनांक १० सप्टेंबरपासून तात्काळ प्रभावाने पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे नांदेडमधून विविध ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय आता दूर होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!