
नांदेड – नांदेड जिल्ह्यात आजचा रविवार २८ एप्रिल हा सर्वाधिक तापमानाचा दिवस ठरला. नांदेडमध्ये ४२.४° अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या उन्हाळ्यातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरला आहे. येत्या काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्रमुख रस्ते दुपारच्या वेळी निर्मनुष्य होत आहेत.
जिल्ह्यात वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशी सूचना जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य विभागाने केली आहे. या आठवड्यात नांदेडमध्ये २२ एप्रिल रोजी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर २३ एप्रिल रोजी ४०.२, २४ एप्रिल रोजी ३९.२, २५ एप्रिल रोजी ३९.६, २६ एप्रिल रोजी ४०.२ आणि २७ एप्रिल रोजी ४१.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
नांदेड लोकसभा मतदार संघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान झाले. २६ एप्रिल रोजी कमाल तापमान ४०.२ अंश सेल्सिअस इतके होते. या वाढत्या तापमानाचाही काही अंशी मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाल्याचे आढळून आले.
२८ एप्रिल रोजी जिल्ह्यात या उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद झाली आहे. रविवारी ४२.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले आहे. आगामी काळात या तापमानात काही अंशाने आणखी वाढ होणार आहे.
नागरिकांनी तीव्र उन्हापासून बचाव होण्यासाठी वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे, कष्टाची कामे सकाळच्या वेळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमानात करावेत. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळया किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत, सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. जलसंजीवनीचा वापर करावा. भरपूर पाणी प्यावे. अधून मधून उन्हामध्ये काम करणे थांबवावे व सावलीत विश्रांती घ्यावी. अस्वस्थ वाटल्यास ताबडतोब उन्हात काम करणे थांबवावे व उपचार सुरु करावा. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे यांचा वापर करावा, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.