
नांदेड – नांदेडमध्ये कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्था म्हटल्या की माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण जे नाव अंतिम करतील तोच त्या पदावर विराजमान होण्याचा इतिहास आहे; मात्र नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडूनच नाव आल्याने नांदेडमध्ये खासदार चव्हाण यांच्या अंतिम निर्णयाला पहिल्यांदाच थेट ब्रेक बसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपमध्ये आता निर्णय प्रक्रिया ही मुख्यमंत्र्यांकडूनच झाल्याने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण समर्थक पूर्णतः हिरमुसले आहेत.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया १० ऑगस्ट रोजी पार पडली. दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलचे जवळपास सर्वच उमेदवार विजयी झाले आहेत. पॅनेलचे २१ पैकी दोन संचालक वगळता सर्व संचालक विजयी झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अध्यक्षपदाची माळ माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण हे जे नाव सुचवतील त्यांच्याच गळ्यात पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. नांदेडचा इतिहासही तसाच होता कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अथवा पक्षीय पातळीवरील निवडीमध्ये खासदार चव्हाण यांचा शब्द अंतिम होता. त्याच अनुषंगाने अशोकराव चव्हाण यांच्या शिफारशीसाठी इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात होते. माजी जिल्हा परिषद सदस्य मारोतराव कवळे यांच्यासह जेष्ठ नेते बी. आर. कदम, माजी आमदार माधवराव जवळगावकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. जवळगावकर यांनी तर अध्यक्षपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचीच परिस्थिती होती. गेल्या काही महिन्यातील जवळगावकर यांची वाटचाल काँग्रेसमध्ये राहून भाजपाच्या जवळ जाणारीच होती. अध्यक्ष पद निवडीनंतर ते भाजप प्रवेश करतील अशी अपेक्षाही व्यक्त केली जात होती. पण इकडे तीन वेळा आमदार राहिलेल्या डॉ. तुषार राठोड तसेच आ.राजेश पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच शब्द टाकला. या दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पदाची मागणी केली. त्यात डॉ. तुषार राठोड हे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद थेट मुख्यमंत्र्यांकडून मिळवण्यात यशस्वी झाले. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी डॉ. तुषार राठोड आणि उपाध्यक्ष पदासाठी मीनल खतगावकर यांचे अर्ज आले त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
उपाध्यक्षपदासाठी ही आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची कन्या प्रणिता देवरे चिखलीकर यांचे नाव पुढे होते. त्यात काँग्रेसचे हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांच्या सुविद्य पत्नी सुशिलाबाई बेटमोगरेकर यांनाही संधी मिळेल अशी अपेक्षा होती; मात्र या सर्व अपेक्षा फोल ठरत जेष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांच्या स्नुषा मीनल खतगावकर यांना संधी देण्यात आली. जिल्हा बँकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून त्यांना मान मिळाला आहे.
भाजपचा कोणताही कार्यक्रम म्हटला की नांदेडमधील शिवाजीनगरातील भाजप महानगर कार्यालय हे ठिकाण ठरलेले त्यात कोणताही विजयी जल्लोष हा महानगर कार्यालयातच होतो पण नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. तुषार राठोड यांचा सत्कार भाजपा नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हा मध्यवर्ती कार्यालय गांधी पुतळ्याजवळ हनुमान पेठ नांदेड येथे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. या सत्कार सोहळ्याचे आयोजन नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी केले आहे. त्यामुळे या सत्कार सोहळ्यास नांदेड भाजपा महानगरातील किती पदाधिकारी आणि किती नूतन जिल्हा परिषद संचालक उपस्थित राहतात याकडेही लक्ष लागले आहे.
माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले.. दोन्ही पदाधिकारी हुशार तेच मला आता सांगतील करायचं काय..? जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या या निवडीतून नांदेड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठा संदेश गेला आहे. जिल्ह्यातील अशोक पर्वाला हा मोठा धक्का मानला जात आहे. निवडीनंतर आमदार डॉ. तुषार राठोड आणि उपाध्यक्ष मीनल खतगावकर यांनी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी ही निवड सर्वानुमते झाल्याचे चव्हाण म्हणाले; पण त्याचवेळी आता मी यांना काय मार्गदर्शन करणार..? दोन्ही पदाधिकारी हुशार आहेत तेच मला सांगतील पुढे काय करायचं असे सांगून चव्हाण यांनी या निवडीबद्दल अप्रत्यक्ष नाराजीही व्यक्त केल्याचे दिसून आले. मीनल खतगावकर यांना उपाध्यक्ष पद मिळवून देण्यात माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे मात्र यशस्वी झाले आहे.



