क्राईम

…अखेर नांदेड जिल्ह्यात बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे बांधकाम कामगारांची नोंदणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

लातूरच्या दक्षता पथकाने उमरीत शेवटच्या दिवशी केला गुन्हा दाखल, अजुनही अनेक तक्रारी आहेत चौकशीवरच... पथकाचा अहवाल ही गुलदस्त्यातच..!

नांदेड – जिल्ह्यात हजारो बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून त्यांना शासन योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. याप्रकरणी जिल्ह्यात दाखल झालेल्या दक्षता पथकाने अखेर आपल्या चौकशीच्या शेवटच्या दिवशी उमरी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल केला आहे. गोरठा आणि शेलगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयाकडून ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र सादर करून बांधकाम कामगारांची नोंदणी केली. या प्रकरणात आता उमरी पोलीस तपास करणार आहेत. दरम्यान, या चौकशी दक्षता पथकाकडे जिल्ह्यातील अनेक भागांकडून अनेक भागातील नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या; मात्र त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी सुरू असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या राज्य सचिव महादेवी मठपती यांनी थेट राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्यासह पालकमंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी, कामगार आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर नांदेड जिल्ह्यात लातूरचे दक्षता पथक ३ जुलै रोजी दाखल झाले होते. या पथकाने १० जुलैपर्यंत जिल्ह्यातील अनेक भागांना भेटी देऊन नांदेड जिल्ह्यातील तक्रारीच्या अनुषंगाने कॉमन सर्विसेस सेंटर, मल्टी सर्विसेस व इतर तक्रारीचे अवलोकन केले. कागदपत्र तयार करून होणाऱ्या नोंदणीबाबत तपासणीदरम्यान बोगस सही, शिक्के, दस्तावेज यांची तपासणी केली. अखेर शेवटच्या दिवशी उमरी येथे बनावट कागदपत्र, शिक्का यांच्या आधारे बांधकाम कामगारांची नोंदणी केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल करून आपल्या कारवाईची नोंद शासनस्तरावर केली आहे. दुसरीकडे पथकाला दिलेल्या अनेक तक्रारीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे. विशेष म्हणजे काही तक्रारदारांनी कागदपत्र आणि काही पुरावेही दिले होते; मात्र त्याकडे दक्षता पथकाने कानाडोळा केल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

नांदेडमध्ये दाखल झालेल्या लातूर येथील दक्षता पथकाने नांदेड येथील श्रावस्तीनगर येथील विनोद कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गोरठा आणि शेलगाव तालुका उमरी येथील ग्रामपंचायत कार्याकडून ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ऑनलाइन संगणक प्रणालीवर किती लोकांनी नोंदणीसाठी अर्ज केले आहेत याची यादी नांदेड कामगार कार्यालयाने कार्यालयाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करून घेतली. सदरची यादी गोरठा आणि शेलगाव येथील ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी यांच्या मार्फत पडताळणी केली. त्यावेळी गोरठा ग्रामपंचायत कार्यालयाने एकूण ४ कामगारांना आणि शेलगाव ग्रामपंचायत कार्यालयाने एकूण १० कामगारांना प्रमाणपत्र दिले आहेत. मात्र या व्यतिरिक्तही अनेक कामगारांची नोंद केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इतर प्रमाणपत्र ही बनावट शिक्का, सहीद्वारे तयार केले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अज्ञात मल्टी सर्विस चालक किंवा बांधकाम ठेकेदार यांनी फौजदारी कट रचून शासकीय योजनेचा आर्थिक लाभ घेण्याच्या उद्देशाने शासनाची फसवणूक केल्याची तक्रार सरकारी कामगार अधिकारी अविनाश अशोकराव देशमुख यांनी उमरी पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी शासनाच्या फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील कामगार उपायुक्त नितीन पाटणकर यांच्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यासाठी दक्षता पथक म्हणून सहाय्यक लातूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले आणि सोबत सरकारी कामगार अधिकारी अविनाश देशमुख आणि श्रीकांत भंडारवार यांची नियुक्ती केली होती. नियुक्ती केलेल्या दक्षता पथकाने नांदेड जिल्ह्यातील तक्रारीच्या अनुषंगाने कॉमन सर्विसेस, सेंटर मल्टी सर्विसेस व इतर तक्रारी असल्यास त्याचेही अवलोकन करून या अनुषंगाने कारवाई करावी तसेच कागदपत्र तयार करून होणारी नोंदणीबाबत तपासणीदरम्यान बोगस सही, शिक्के, दस्तावेज यांची तपासणी संबंधित प्राधिकार्‍याकडून करून घ्यावी. तपासणी मोहीम राबवून सहाय्यक पथक प्रमुख यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे लेखी आदेश दिले होते. त्यानुसार ही चौकशी दक्षता पथकामार्फत करण्यात आली.

स्वतःच्या कारभाराची स्वतःच केली चौकशी..!  छत्रपती संभाजीनगर येथील कामगार उपायुक्त यांच्या आदेशानुसार नांदेडमध्ये दाखल झालेले दक्षता पथक तीन सदस्यीय होते. यात लातूरचे कामगार अधिकारी मंगेश झोले हे समितीचे प्रमुख होते. या समितीत अन्य दोन सदस्यही होते. या दोन्हीही सदस्यांनी नांदेड जिल्ह्यात कामगार आयुक्त कार्यालयात काम केले होते. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व कारभार त्यांना माहीत होता किंवा त्यांच्या काळातच अनेक प्रमाणपत्र तसेच योजनांचा लाभ देण्यात आला होता. असे असताना त्यांनी केलेल्या कारभाराची चौकशी त्यांच्याकडूनच करून घेण्यात आली. अनेक तक्रारींकडे कानाडोळा करून शेवटी एक तरी गुन्हा दाखल व्हावा या अनुषंगाने उमरी येथे शेवटच्या दिवशी या दक्षता पथकातील सदस्यांनी तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हाही अज्ञात मल्टी सर्विस चालक अथवा बांधकाम ठेकेदारावर करण्यात आला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!