
नांदेड – नांदेडमध्ये रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात मोठे नाराजीनाट्य पहावयास मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नांदेड महानगर जिल्हाध्यक्ष आणि दक्षिण जिल्हाध्यक्ष यांच्या बदलानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी रविवारी या. चिखलीकर यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावरच नाराजी व्यक्त केली. प्रदेश सचिवपदी नियुक्ती झालेले दिलीपराव धर्माधिकारी यांनीही या पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतल्याने राष्ट्रवादीतील नाराजीनाट्य ठळकपणे पुढे आले. तिकडे पक्षाचे माजी महानगराध्यक्ष जीवन पाटील घोगरे यांनीही आता आ. चिखलीकर यांना नेता मानण्यास नकार दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात नांदेडमध्ये रविवारी मोठे फेरबदल केल्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत केली. अर्धापूर, हदगाव तालुक्यातील शिवसेना, भाजप आणि काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. याच प्रवेशादरम्यान काही नियुक्त्यांचीही घोषणा करण्यात आली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदी मीनल खतगावकर, शहर नांदेड शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी माधव पावडे, वरिष्ठ उपाध्यक्षपदी साबेर चाऊस यांची निवड करण्यात आली. नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दिलीपराव धर्माधिकारी यांच्याऐवजी आता शिवराज पाटील होटाळकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. दिलीपराव धर्माधिकारी यांना प्रदेश सचिव पदावर प्रमोशन मिळाले आहे. मात्र या प्रमोशनवरही ते नाराज असल्याचे दिसले. त्यांनी पत्रकार परिषद सुरू असतानाच तिथून काढता पाय घेतला. मात्र त्यापूर्वी खरे नाराजीनाट्य समोर आले होते ते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या संवादातून. खतगावकर यांनी रविवारी झालेल्या सर्व निवडीच स्वागत असल्याचे सांगितले. मात्र नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी झालेली निवड आपल्याला विचारात न घेता झाल्याचे त्यांनी मंचावरूनच स्पष्ट केले. आमदार चिखलीकर हे सकाळीच आपल्याशी बोलले होते; मात्र त्यावेळी रविवारी घोषित होणाऱ्या निवडीमध्ये नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षांचा विषय नव्हता असेही त्यांनी स्पष्ट केले. नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी झालेल्या शिवराज पाटील होटाळकर यांच्या या निवडीबाबत आता आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी चिखलीकरांसमोरच स्पष्ट केले. कारभार करा मात्र घरातील सासूलाही काही गोष्टी विचारा असा सल्लाही त्यांनी आमदार चिखलीकरांना दिला. चिखलीकरांवर रोष व्यक्त करून माजी खासदार खतगावकर यांनी पत्रकार परिषद सोडली. त्यानंतर चिखलीकरांनी सारवासारव करताना खतगावकर हे वरिष्ठ नेते आहेत, काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे झाल्या नसतील त्यामुळे ते नाराज असतील असेही ते म्हणाले. मात्र या सर्व निवडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील तटकरे, पक्षाचे नेते अजित पवार यांच्या मान्यतेनुसारच झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी महायुतीचे वरिष्ठ तीन नेतेच महायुती की स्वबळावर याबाबत निर्णय घेतील असे स्पष्ट केले. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिल्यास त्याबाबतही आमची तयारी सुरू आहे तसेच स्वबळावर लढण्याचा निर्णय झाल्यास त्यासाठीही आम्ही सज्ज असल्याचे सांगितले. यावेळी नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, शिवराज पाटील होटाळकर, मोहन हंबर्डे, अविनाश घाटे, व्यंकटराव गोजेगावकर, मुक्तेश्वर धोंडगे, स्वप्नील चव्हाण, गफार खान, वसंत सुगावे आदींची उपस्थिती होती.
आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये जिल्ह्यात निर्माण झालेली ही दरी आता पक्षासाठी किती हानीकारक ठरते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.त्यामुळे राष्ट्रवादीतील या निवडी आता पक्षातील असंतोषाला वाट करून देतील का याकडे लक्ष लागले आहे.



