
नांदेड – ट्रॅक्टर एजन्सी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी एक लाखांची लाच मागितल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोहेकॉ ज्ञानेश्वर भीमराव तिडकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच प्रकरणात तीन वेळा सापळा रचूनही प्रत्यक्ष सापळा यशस्वी झाला नाही. त्यामुळे तिडकेविरुद्ध अखेर लाच मागितल्याचा गुन्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामीण ठाण्यात दाखल केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराने फायनान्स कंपनीकडून ट्रॅक्टर घेतला होता. तो ट्रॅक्टर एजन्सीच्या मालकाने तक्रारदाराच्या संमतीशिवाय ओढून नेला. त्यामुळे तक्रारदाराने एजन्सी चालकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज दिला होता. हा अर्ज चौकशीसाठी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोहेकॉ ज्ञानेश्वर तिडके यांच्याकडे सोपवला. त्या अर्जावर कारवाई करण्यासाठी तक्रारदार हे पोलीस कर्मचारी तिडके यांना भेटले. त्यावेळी तिडके यांनी ‘पैसे देऊन साहेबांना भेटावे लागते तरच कारवाई होते, नाहीतर असेच अर्ज पडून राहतात’ असे म्हणून अर्जदार यांच्याकडे ठाणेदारांना सांगून फिर्याद दाखल करण्यासाठी १२ हजार रुपयांची मागणी केली.
या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ७ मे २०२५ रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान तिडके यांनी तक्रारदार यांच्या अर्जातील गैर अर्जदार एजन्सी चालकावर चोरीचा गुन्हा दाखल करून त्याची एफआयआर प्रत देण्यासाठी तक्रारदारांकडे तब्बल एक लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या पडताळणीनंतर पोहेकॉ तिडके यांच्यावर सापळा कारवाई करण्यासाठी तक्रारदाराला पाठवले होते. परंतु तिडके मिळून आले नाहीत. त्यांचा मोबाईल बंद होता. १४ मे, १९ मे आणि २० मे २०२५ असे तीन दिवस सापळा कारवाईसाठी प्रयत्न करण्यात आले.
या प्रकरणाचा तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक प्रीती जाधव या करत आहेत. तर पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस उपाधीक्षक प्रशांत पवार हे काम पाहत आहेत. या प्रकरणाच्या कारवाईत पोलीस हवालदार किरण कणसे, पोलीस शिपाई ईश्वर जाधव, श्याम गोरपले, प्रकाश मामुलवार यांचा समावेश होता.
दरम्यान, या कारवाईमध्ये ७ मे २०२५ रोजी पोहेकॉ तिडके यांनी तक्रारदार यांच्या तक्रारी अर्जावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाले होते. त्यानंतर सदरील लाच प्रकरणातील तक्रारदार यांचा शोध घेतला परंतु तेही सापडले नाहीत. त्यांचा फोनही बंद होता. त्यामुळे या लाच मागणी पडताळणी कार्यवाहीमध्ये सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक माधुरी यावलीकर यांनी सरकारतर्फे २८ जुलै रोजी पोहेकॉ ज्ञानेश्वर भीमराव तिडके यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, ७ ए अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली आहे.



