
नांदेड – गोदावरी नदीत स्वतः पोहत जाऊन वाळू माफियांवर कारवाई करणारे नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांची रवानगी आता थेट कंट्रोल रुममध्ये करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील एका कर्मचाऱ्यावर झालेली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई यासाठी कारणीभूत ठरली असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी रात्रीपासून नांदेड ग्रामीण ठाण्याचा पदभार आता पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
नांदेड ग्रामीण ठाण्यात वर्षभरापूर्वी रुजू झाल्यानंतर पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी गुन्हेगारांवर कारवाईचा धडाका सुरू केला होता. मोकातील एका गुन्हेगाराला स्वतः गोळी घालून पकडले होते. अनेक गुन्हेगारांना हद्दपारही केले. वाळू माफियांवरही अनेक कारवाया केल्या होत्या. सामान्य नागरिक त्यांच्या कामगिरीबद्दल समाधानी असताना त्यांच्या कारभाराबद्दल राजकीय मंडळीकडून अनेक तक्रारीही झाल्या होत्या. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी त्यांना मोठे पाठबळ दिले होते. २०२१ च्या एका प्रकरणात अनेक ठाण्यात तक्रारींचे सत्र सुरू झाले होते. ही तक्रार पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्यानंतर त्याचा तपास ग्रामीण ठाण्यातील पोहेकॉ ज्ञानेश्वर तिडके यांच्याकडे सोपवण्यात आला. या प्रकरणातील तक्रारदाराने तिडके यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यासाठी पैशांची मागणी केल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली या तक्रारीवरून कारवाई सुरू झाली; मात्र पुढे तक्रारदारानेच यू टर्न घेत आपण गैरसमजातून ही तक्रार केल्याचे बाँडवर वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिहून दिले. त्यानंतरही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने स्वतः तक्रार देत या प्रकरणात तिडकेविरुद्ध दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला.
या तक्रारीत ‘पैसे देऊन साहेबांना भेटावे लागते, तरच कारवाई होते’ असे तिडके यांनी म्हटल्याचे नमूद होते. त्यामुळे ‘तो’ साहेब कोण असा प्रश्न पुढे आला होता. यापूर्वीही एका प्रकरणात नांदेड ग्रामीण ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विश्वदीप रोडे यांच्याविरुद्ध पैशांच्या मागणीवरून तक्रार झाली होती. या तक्रारीनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या चौकशी अहवालानंतर नांदेड पोलीस परिक्षेत्राचे उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी रोडे यांना निलंबित केले होते. या निलंबनाविरुद्ध रोडे मॅटमध्येही गेले होते. मात्र मॅटमध्ये रोडेचे निलंबन योग्यच ठरविण्यात आले होते. त्यानंतर आता हे तिडके प्रकरण पुढे आले आहे. त्यातच चिंचोलकरविरुद्ध सुरू असलेल्या राजकीय तक्रारींचा ओघ पाहता त्यांना कंट्रोल रूमला अटॅच करणे सोयीचे ठरले आहे.
नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीत सुरू असलेल्या वाळू उपसा रोखण्यासाठी २४ जुलै रोजी गोदावरी नदीत उडी मारून केलेल्या कारवाईनंतर संपूर्ण राज्यात प्रकाश झोतात आलेल्या चिंचोलकर यांना पाच दिवसातच कंट्रोलला अटॅच व्हावे लागले. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमाप यांनी मंगळवारी अवैध वाळू माफीयांशी संधान जुळवलेल्या आणि असलेल्या मधुर संबंधामुळे एका पोलीस उपनिरीक्षकासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई केली आहे. त्यातच चिंचोलकर यांनाही ग्रामीण ठाण्यातून कंट्रोलला अटॅच करणे यामध्येही काही संबंध आहे का याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे. नांदेड जिल्ह्यात उमापांचे असलेले नेटवर्क पाहता कोणतीही गोष्ट लपून राहत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यापूर्वीही लोहा येथे विशेष पथकाकडून वाळू माफियांकडून रोख रक्कम घेताना उमाप यांनी रंगेहाथ पकडले होते. ते संपूर्ण पथक निलंबित करण्याची कारवाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा उमाप यांनी केलेली कारवाई चर्चेत आली आहे.



