क्राईम

…अखेर येळी घाटावर नांदेड पोलीस, महसूलची संयुक्त कारवाई..!

उप महानिरीक्षक उमापांनी बदली सत्र सुरू करताच पोलिसांसह महसूल विभागही कारवाईसाठी सरसावला, तब्बल ४ कोटी ७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड – जिल्ह्यात वाळूमाफियांशी पोलिसांनी थेटपणे साधलेले संधान गेल्या चार दिवसापासून उघड होत आहे. नांदेड पोलीस परिक्षेत्राचे उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी हे मधुर संबंध उघड केले असून आता संबंधितांना थेट नियंत्रण कक्षात पाठवले जात आहे. अनेकांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ज्या पथकाकडे वाळू उपसा रोखण्याची जबाबदारी दिली होती त्यांनीच वाळूमाफीयांशी हातमिळवणी केल्यामुळे त्या संपूर्ण पथकाला निलंबित करण्याची कारवाईही करण्यात आली आहे. कारवाईचा हा धडाका पाहता अखेर लोहा तालुक्यातील येळी घाटावर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच लोहा तहसीलचे महसूल अधिकारी गुरुवारी सकाळीच पोहोचले. त्यांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४ कोटी ७२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोहा तालुक्यातील येळी घाटावर गेल्या वर्षभरापासून दिवस रात्र खुलेआम वाळू उपसा सुरू असताना कारवाईची धमक मात्र दाखवली जात नव्हती. एक कारवाई स्थानिक गुन्हा शाखेने केली होती; मात्र ती कारवाईही वादग्रस्तच ठरली होती. त्या कारवाईनंतर दोन दिवसातच त्या ठिकाणचा वाळू उपसा पुन्हा सुरू झाला होता. तो दिवस रात्र सुरूच होता. यासाठी मोठमोठ्या बोटींचा वापर केला जात होता. अनेक माध्यमांनी याकडे वरिष्ठांचे लक्ष वेधूनही कारवाई मात्र शून्य होती. राजकीय हस्तक्षेपामुळे ही कारवाई केली जात नव्हती असेही स्पष्टपणे सांगितले जात होते. अखेर पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सुरू केलेल्या बदली सत्रानंतर मात्र पोलीस आणि महसूल विभागही खडबडून जागा झाला. भनगी, लिंबगाव पाठोपाठ बहुचर्चित येळी घाटावरही कारवाई करण्यात आली आहे.
महसूल दिनाच्या पूर्वसंध्येलाच झालेल्या या कारवाईत पोलिसांनी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये संभाजी प्रभाकर सोमवारे रा. येळी, व्‍यंकटी आनंदराव ढगे, संदीप रामराव ढेपे रा. मारतळा, ओमप्रकाश एकनाथ जाधव रा. चिंचोली आणि गजानन सुदाम हावणे रा. कौडगाव यांच्याविरुद्ध उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आणि महसूल विभागाच्या या संयुक्त कारवाईत गुरुवारी साडेतीन कोटी रुपयांच्या ७ जेसीबी मशीन पकडण्यात आल्या आहेत. त्यासोबतच चार मोठ्या फायबर बोट ज्यांची किंमत ६९ लाख रुपये आहे. साठ लाखांच्या सहा छोट्या इंजिन बोटही या कारवाईत पकडण्यात आले असून पन्नास ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ४ कोटी ७२ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
कंधारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांच्यासह लोह्याचे तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत गुरुवारी सकाळी सात वाजताच संयुक्त पथक येळी घाटावर दाखल झाले. येळीसह कौडगाव येथेही पोलिसांनी कारवाई केली. तेथे अवैधरित्या वाळू उपसा सुरू होता. पोलिसांना पाहताच वाळू उपसा करणारे गोदावरी नदीत उड्या मारून पळून गेले. सदर ठिकाणी ७ जेसीबी, ४ फायबर बोटी, ६ इंजिन बोट तसेच ५० ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत उस्माननगर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार, उपनिरीक्षक गजानन गाडेकर, संजय मुंडे, पोहेकॉ गंगाधर चिंचोरे, निलप्पा पवार,  मधुकर पवार, सुशील कुबडे, श्याम वडजे, पोकॉ प्रकाश पेदेवाड, माधव पवार, तुकाराम पवार, राठोड यांचा समावेश होता.

वरिष्ठांपर्यंत थेट वाट्याची चर्चा..! लोहा तालुक्यातील येळीसह परिसरातील घाटावर वाळू उपसा सुरू ठेवण्यासाठी लोहा तसेच मुदखेड तालुक्यातून स्थानिक पातळीवर थेट वाटा दिला जात होता. हा वाटा अगदी वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी स्थानिकावर होती. त्यामुळेच खुलेआम महाकाय अशा बोटीद्वारे येथे दिवस रात्र वाळू उपसा केला जात होता. सामान्य नागरिक येळी – महाटी पुलावरून ये- जा करत असताना उघड्या डोळ्यांनी हा वाळू उपसा दिवस रात्र पहात होता. मात्र त्यावर महसूल अधिकारी कारवाई करत ना पोलीस अधिकारी.  हा सर्व परिणाम वरिष्ठांपर्यंत पोहोचत असलेल्या वाट्याचाच असल्याची चर्चा सामान्य नागरिक येथे नेहमीच करतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!