नांदेड – जिह्यात अवैध वाळूमाफियांविरुद्ध पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून आता कोणत्याही परिस्थितीत अवैध वाळू उपसा केला जाऊ देणार नाही असा दृढ प्रण पोलिसांनी केला असल्याचे स्पष्ट होत आहे. नांदेड पोलीस परिक्षेत्राचे उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानंतर जिल्ह्यात या कारवाईला गती आली आहे. बहुचर्चित येळी घाटावर सलग दुसऱ्या दिवशीही पोलिसांनी कारवाई केली. उस्माननगर पोलिसांपाठोपाठ कुंटूर पोलिसांनाही अखेर कारवाई करावी लागली. कारवाईत पहिल्या दिवशी चार बोटी सापडल्यानंतर दुसऱ्या दिवशीही तीन महाकाय बोटी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्या बोटी जिलेटिनच्या स्फोटाने नष्ट करण्यात आल्या आहेत.
अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफीयांनी थेट पोलिसांशी संधान साधल्याची बाब या आठवड्यातच उघड झाली आहे. त्याचा फटका अनेक पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनाही बसला आहे. कंट्रोलमध्ये रवानगी आणि निलंबन असा दुहेरी तडाखा अशा वाळू माफीयांशी संधान साधणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. या कारवाईनंतर आता नांदेड पोलिसांनी अशा अवैध वाळू माफीयांना रोखण्यासाठी मोहीमच सुरू केली आहे भनगी, लिंबगाव, येळी पाठोपाठ बरबडा, महाटी, बळेगाव बंधारा परिसर या भागात शनिवारी कुंटूर पोलिसांनी कारवाई केली.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक विशाल भोसले, बिलोलीचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारीही सहभागी झाले होते. पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याची माहिती मिळताच नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनाही नाईलाजाने का होईना घटनास्थळी पोहोचावे लागले. शनिवारी पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आणखी तीन महाकाय बोटी पकडण्यात आल्या. त्या बोटी जिलेटिनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या आहेत. येळी तसेच परिसरातील या घाटावर पहिल्यांदाच पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत कोट्यावधींचे साहित्य नष्ट करून वाळू माफीयांचे कंबरडे मोडले आहे. आता आणखी किती दिवसानंतर या भागातील वाळू माफिया पुन्हा नव्या तयारीने मैदानात उतरतील याकडेही लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात भर पावसाळ्यातही आणि गोदावरी नदीला पूर आला असतानाही बोटीच्या सहाय्याने आणि वेगवेगळ्या यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरूच होत वाळू माफीयांनी गोदाकाठावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्तेही तयार केले आहेत. गावात चालायला रस्ते नाहीत मात्र वाळूमाफीयांनी बाराही महिने अवैध वाळू उपसा करता यावा यासाठी नदीकाठी रस्त्यांचे मजबूत जाळे तयार केले आहे. त्यामुळे पावसाचाही कोणताही परिणाम अवैध वाळू उपसावर होत नव्हता. परिणामी या वाळू उपशातून कोट्यवधीची उलाढाल सुरूच होती. ही उलाढाल अनधिकृतपणेच असल्याने मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या धंद्यात उतरले आहेत. स्थानिक महसूल तसेच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आणि वरिष्ठांचीही मर्जी राखून हा कारभार सुरू होता. त्याचवेळी वाळू उपसा करण्यासाठी उत्तर प्रदेश बिहार या राज्यातून मोठ्या प्रमाणात मजुरांची आयात या वाळू माफीयांनी केली आहे. त्यांना अत्यल्प मजुरी देऊन त्या मजुरांचेही शोषणही या वाळूमाफियांकडून सुरू आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहारमधून येत असलेल्या या वाळू मजुरांमध्ये काही असामाजिक तत्त्वेही आपली पोळी भाजून घेत आहेत. मोठ्या प्रमाणात गावठी कट्ट्यांची तस्करी या मजुरांच्या माध्यमातून होत असल्याच्या अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. मात्र होत असलेली कोट्यवधींची आर्थिक उलाढाल यातून संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी याकडे कानाडोळा करत असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्रच आहे.