
नांदेड – राष्ट्रीय महामार्ग ३६१ वरील नवीन नांदेडातील वसरणी येथे भुयारी मार्ग करण्यात यावा या मागणीसाठी वसरणी येथील गावकऱ्यांनी २ ऑगस्टपासून राष्ट्रीय महामार्गावरच बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रमुख शुद्धोधन कापसीकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहे. या आंदोलनास नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनी भेट देऊन या विषयासंदर्भात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन दिले.
राष्ट्रीय महामार्ग ३६१ हा महाराष्ट्रातील महामार्ग आहे. हा महामार्ग तुळजापूरपासून बुटीबोरीपर्यंत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील नवीन नांदेडातील वसरणी हे गाव राष्ट्रीय महामार्गाच्या दक्षिण-उत्तर दोन्ही बाजुला विभागले गेले आहे. या गावाची लोकसंख्या दक्षिण भागाला ५ ते ६ हजार तर उत्तरेला मूळ गावात ८ ते १० हजार लोकसंख्या आहे. राष्ट्रीय महामार्गामुळे दोन्ही बाजुनी होणारी दररोजची ये- जा पूर्णपणे बाधित होणार आहे. हा महामार्ग ओलांडण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे कामाला जाणारे कामगार, मूळ गावात जि.प. इयत्ता ८ वीपर्यंत शाळा असल्यामुळे तिथे जाणारे शाळकरी विद्यार्थी, दक्षिण भागात असलेल्या शेतीमुळे गावातून जाणारे गुरे-ढोरे या सर्वांना दक्षिणेकडून उत्तरेकडे ये-जा करण्यासाठी महामार्ग ओलांडून जावा लागणार आहे. नांदेड आकाशवाणी केंद्र हे केंद्र सरकारची अतिशय महत्त्वाची प्रसारण संस्था येथे असताना पर्यायी मार्गाची कोणतीही व्यवस्था राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापनाने केली नाही.
राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना वाहनांचा वेग पाहता भविष्यात मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातून या ठिकाणी जिवीत हानी घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच अंत्यविधीचे ठिकाण राष्ट्रीय महामार्गाच्या उत्तर बाजूस आहे. त्याचबरोबर गावातील तिर्थस्थळे (मंदिर, विहार, मज्जीद) हे मुळ गावात असल्यामुळे दररोज ये-जा करण्यासाठी हा महामार्ग धोकादायक ठरु शकतो. भारतीय राष्ट्रीय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार हलके वाहनासाठी अंडरपास दिला जाऊ शकतो. तसेच गुरे-ढोरे / पादचाऱ्यांसाठी अंडरपास आणि पादचाऱ्यांसाठी पूलसुध्दा प्रदान केला जाऊ शकतो. तसेच शाळा, रुग्णालय, कारखाना यापासून २०० मिटर अंतरावर पादचाऱ्यांसाठी अंडरपास ब्रिजदेखील उपलब्ध केला पाहिजे अशी तरतूद आहे. यापूर्वीही २० जुलै रोजी निदर्शने करून वसरणीकरांनी आपल्या मागणीकडे लक्ष वेधले होते. मात्र त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. या राष्ट्रीय महामार्गावर वसरणी येथे भुयारी मार्ग देण्यात यावा, या मागणीसाठी वसरणी येथे राष्ट्रीय महामार्गावरच गावकऱ्यांनी येथे दिनांक २ ऑगस्टपासून वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांच्यासह शिवसेनेचे नांदेड दक्षिण जिल्हाप्रमुख विनय गिरडे, नांदेड शहर प्रमुख तुलजेश यादव, नवीन नांदेड प्रमुख सुहास खराणे यांच्यासह सेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी बोंढारकर यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण या प्रश्नावर दिल्ली दरबारी गडकरी यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले. या आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडीचे शुद्धोधन कापसीकर, महेंद्र सोनकांबळे, भालचंद्र मोळके, महेश गजभारे, अंशुमन गजभारे, चंद्रभागाबाई कापसीकर, वंदनाबाई ढवळे, जनाबाई पोवळे, शांताबाई पोवळे, रावसाहेब खराणे, लक्ष्मण काळे, लताबाई शिंगाडे यांच्यासह शेकडो गावकऱ्यांची उपस्थिती होती. या आंदोलनादरम्यान नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
धनेगाव पाठोपाठ वसरणीकरांनीही राष्ट्रीय महामार्गाचे काम रोखले..राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील धनेगाव पाठोपाठ आता वसरणी येथील नागरिकांनीही पर्यायी मार्गासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याचे काम वेगवेगळ्या कारणामुळे रखडले आहे. वंचित बहुजन युवा आघाडीने वसरणी येथे रस्ता ओलांडण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर भुयारी मार्ग द्यावा या मागणीसाठी २० जुलै रोजी निदर्शने केली होती. दोन ऑगस्ट पासून आता बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. एकूणच या राष्ट्रीय महामार्गाच्या नियोजनाबाबत आता साशंकता निर्माण झाली असून दहा हजाराहून अधिक लोक वस्तीच्या गावांना कोणताही पर्यायी मार्ग न देता रस्त्याची रचना केली कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पर्यायी मार्ग अभावी स्थानिक नागरिकांना वेठीस धरण्याचे काम राष्ट्रीय महामार्गाकडून केले जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे शुद्धोधन कापसीकर यांनी केला आहे.



