
नांदेड :- नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ महिन्यातील भीषण पुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाला केले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यातील महसूल विभाग आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातील महाराष्ट्र राज्य तहसिलदार, नायब तहसिलदार संघटना (जिल्हा नांदेड), महाराष्ट्र राज्य तलाठी संघ (राज्यस्तरावरून) तसेच महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना (जिल्हा) यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी आपला एक दिवसाचा वेतन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
नांदेड जिल्हा परिषद येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनीही जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत बाधितांना मदत म्हणून एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल आणि जिल्हा परिषद अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतनातून जमा होणारा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दिली आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलातील एक दबंग अधिकारी म्हणून परिचित असलेले नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी आपले एक महिन्याचे वेतन आणि वजिराबाद ठाण्यातील पोहेकॉ जी. बी. शेळके यांनी आपले १५ दिवसांचे वेतन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देण्यास संमती दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातून आता पूरग्रस्त शेतकऱ्यांचे मदतीसाठी हात पुढे येत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.



