
नांदेड – गरबा चालवायचा असेल तर आम्हाला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, नाही दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत डेकोरेशन व्यावसायिकावर तलवारीने हल्ला केल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी रात्री घडली होती. या प्रकरणात वजीराबाद पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी या तिघांनाही घटनास्थळी नेऊन जिथे दहशत माजविण्याचा प्रयत्न केला तिथे माफी मागायला लावून त्यांची दहशत कमी केली आहे.
नांदेड शहर आणि जिल्ह्यात सध्या नवरात्र महोत्सवाचा आनंद शिगेला पोहोचला आहे. अनेक ठिकाणी दांडिया, गरबा महोत्सव सुरू आहेत. याच महोत्सवादरम्यान शहरातील व्यंकटेशनगर येथे जय दुर्गामाता महोत्सवात २५ सप्टेंबर रोजी गणपत मठवाले, ऋषी भाटिया, कुणाल सिंग आणि मनप्रीत सिंग उर्फ सोनू औलख सर्व रा. नांदेड हे तेथे पोहोचले. त्यांनी वैभव शिवराम गुरव या डेकोरेशन व्यावसायिकास तुला गरबा चालवायचा असेल तर आम्हाला रोज दहा हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल, अन्यथा जिवे मारू अशी धमकी दिली. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर गणपत मठवाले याने तलवारीने गुरव या व्यावसायिकास ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. उपस्थित नागरिकांनी सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याही अंगावर ते धावून गेले शिवीगाळ केली. तुम्ही हप्ता द्या, नाहीतर तुम्हाला जीवे मारू अशी धमकी दिली. हा सर्व प्रकार घडत असताना तेथे उपस्थित असलेल्या महिला, मुली यांच्यात एकच दहशत निर्माण झाली. भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणात वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वजीराबाद पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तातडीने करताना तिघा जणांना अटक केली आहे. एकजण पळून गेला आहे. या तिघांनाही न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सोमवारी वजीराबबादचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी मोठ्या बंदोबस्तात तिन्ही आरोपींना घटनास्थळी स्पॉट व्हेरिफिकेशनसाठी घेऊन गेले. २५ सप्टेंबर रोजी केलेल्या कृत्याची आरोपींकडून माफीही वदवून घेण्यात आली आहे. त्याचवेळी ठाणे हद्दीतील सर्व परिसरात या आरोपींची पोलिसांनी धिंड काढून आरोपींची दहशत कमी केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पुणे हे करीत आहेत.
काही दिवसांपूर्वीच मुख्य पोस्ट ऑफिस कार्यालयाजवळील दारू विक्रेत्याला मारहाण करणाऱ्या आरोपींचीही याच पद्धतीने वजीराबाद पोलिसांनी धिंड काढली होती. गेल्या महिन्याभरात वेगवेगळ्या गुन्ह्यातील पाच आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आहे. कोणत्याही परिस्थितीत वजीराबाद ठाणे हद्दीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना कठोर शासन केले जाईल, असे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी स्पष्ट केले आहे. आगामी काळातील सण उत्सवादरम्यान शांतता राहील, यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, शहर उपविभागीय अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचेही पोलीस निरीक्षक कदम यांनी स्पष्ट केले आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरही पोलिसांची करडी नजर असल्याचे त्यांनी सांगितले.



