
नांदेड – कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनससह सेवानिवृत्त, मयत आणि कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक लाभ तसेच ५६ महिन्यांचा थकीत महागाई भत्ता अदा करण्याबाबत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.त्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या धर्तीवर सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याच्या मागणीसाठी १४ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्याने आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात कोणताही तोडगा न निघाल्याने १६ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व विभाग या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत मनपा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका शहरवासीयांना बसणार आहे
कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या या विविध मागण्यासाठी मंगळवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चर्चा केली; मात्र त्यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे बुधवारी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने महापालिकेपुढे द्वारसभा घेऊन आपल्या मागण्या पुन्हा एकदा प्रशासनापुढे ठेवल्या; तरीही कोणतेही ठोस आश्वासन अथवा कृती न झाल्याने गुरुवारपासून कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने संप पुकारला आहे. बुधवारी झालेल्या आंदोलनात चांगला प्रतिसाद मिळाला सर्व विभागाचे कर्मचारी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गुरुवारपासून होणाऱ्या संपात महापालिकेअंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व विभागाचे कर्मचारी सहभागी होतील, असे संघटनेचे महानगराध्यक्ष साहेबराव ढगे यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करणे शक्य नसल्याने या परिस्थितीत संघटनेने आंदोलन करू नये असे पत्र प्रशासनाकडून संघटनेला देण्यात आले आहे; मात्र संघटनेच्या मागण्यावर प्रशासनाने कोणताही सकारात्मक निर्णय न घेतल्याने संघटना आपल्या संपाबाबतच्या निर्णयावर ठाम असल्याचेही महानगराध्यक्ष साहेबराव ढगे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ऐन दिवाळीत होत असलेल्या आंदोलनाचा शहरवासीयांनाही निश्चितपणे फटका बसणार आहे. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी गुरुवारी नांदेडमध्ये पोहोचतील. त्यामुळे त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात गुरुवारी नेमका काय तोडगा काढला जातो, याकडेही लक्ष लागले आहे.



