अपघात

नांदेडमध्ये श्री गणेश विसर्जनादरम्यान दोन तरुण बुडाले 

गाडेगाव येथील आसना नदीवरील घटना, एसडीआरएफ पथक, पोलीस दल तसेच महसूल विभागाकडून दोन्ही तरुणांचा शोध सुरू

नांदेड – जिल्ह्यात विघ्नहर्ता श्री विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच नांदेडजवळील गाडेगाव येथे आसना नदीत दोन तरुण बुडाल्याची माहिती पुढे आली आहे. या दोघांचाही शोध ‘एसडीआरएफ’च्या पथकाकडून घेतला जात आहे. हे दोन्ही तरुण गाडेगाव येथील रहिवासी आहेत. शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हे तरुण आसना नदीत बुडाल्याची बाब लक्षात येताच त्यांचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे.
शनिवारी सकाळपासूनच घरगुती गणेशाचे विसर्जन सुरू झाले होते. अनेक भाविक आपल्या लहान मोठ्या वाहनातून आपल्या लाडक्या बापाला निरोप देत होते. दुपारनंतर सार्वजनिक मंडळांनीही श्री विसर्जनाला प्रारंभ केला. नांदेड शहरात महापालिकेने २८ ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करून श्री विसर्जनाची व्यवस्था केली होती; तर सहा फुटावून अधिक उंचीच्या मूर्ती पुयणी येथील तलाव आणि झरी येथील खदानीत विसर्जित करण्यात आल्या. या विसर्जन कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महापालिकेने जवळपास ३०० हून अधिक जीवरक्षकांचीही नियुक्ती केली आहे.
नांदेड शहर आणि परिसरात श्री विसर्जन उत्साहात सुरू असताना नांदेड शहराचे गाडेगाव येथे आसना नदीत तिघेजण बुडाल्याची माहिती पुढे आली. त्यातील एका तरुणाला शोधण्यात आले तर योगेश गोविंदराव उबाळे वय १७ वर्ष आणि बालाजी कैलास उबाळे वय १८ वर्ष हे दोघेजण मात्र अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांचा एसडीआरएफ, स्थानिक पोलीस दल तसेच महसूल पथकाकडून शोध घेतला जात आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून या घटनेबाबत माहिती मिळताच नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. रात्री दहा वाजेपर्यंत त्या दोन्ही तरुणांचा कोणताही शोध लागला नव्हता
दरम्यान, नांदेड महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार रात्री नऊ वाजेपर्यंत नांदेड शहरात २५ हजार ९५२ गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या २३ मूर्ती संकलन केंद्रात ९ हजारांहून अधिक श्री मूर्ती भाविकांनी विसर्जनासाठी सुपूर्द केल्या होत्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!