क्राईम

नांदेडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे मागितले महसूल कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपये..!

व्हाट्सअपद्वारे केला बनावट संदेश, वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

नांदेड – नांदेडमध्ये चक्क जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या फोटोचा आणि नावाचा वापर करून एका अज्ञात आरोपीने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना व्हाट्सअपद्वारे ५० हजार रुपयांची गरज असल्याने ऑनलाइन पद्धतीने तात्काळ पैसे पाठवा असा संदेश पाठविला. याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात +84 56 48 73 858 या क्रमांकाच्या मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  वेळीच सतर्कता बाळगत जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ गुन्हाही दाखल केला आहे.

नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करून ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्हाट्सअप क्रमांकावर इंग्रजीतून ‘ माझी फक्त एक वैयक्तिक विनंती आहे. माझ्या वतीने तुम्ही तातडीने काही रोख रक्कम संभाव्य ग्राहकांच्या खात्यात जमा करावी अशी माझी इच्छा आहे. मी सध्या एका बैठकीला जात आहे आणि सध्या माझ्या ऑनलाइन बँक ट्रान्सफरमध्येही काही समस्या येत आहेत. कृपया ते त्वरित करणे शक्य आहे, का ते मला कळवा जेणेकरून मी अधिक माहिती देऊ शकेन. दिवस संपण्यापूर्वी मी तुम्हाला परतफेड करेन.” हा मेसेज बनावट आणि फसवणूक करणारा असल्याचे लक्षात येताच या प्रकरणी नांदेडचे तहसीलदार आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडून वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र देण्यात आले. या पत्रांनुसार वजीराबाद पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू वटाणे यांच्या आदेशानुसार तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक माळी हे करीत आहेत.

फेसबुक, व्हाट्सअप तसेच विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना फसवण्याचे प्रकार घडत आहेत. आता थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावेच व्हाट्सअप संदेश पाठवून फसवणुकीचा नवा प्रकार नांदेडमध्ये घडला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून येत असलेल्या बनावट आणि फसवणुकीच्या मेसेज संदर्भात नागरिकांनी सजग रहावे, खात्रीशीर पद्धतीनेच बँक व्यवहार करावेत आणि आपली फसवणूक टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!