
नांदेड – सिडकोतील संभाजी चौक येथे किरकोळ कारणावरून खून करणाऱ्या १९ वर्षीय युवकास स्थानिक गुन्हा शाखेने घटनेच्या २४ तासाच्या आत जेरबंद केले आहे. खून केल्यानंतर संशयित हा पळून गेला होता. त्याच्या मागावर असलेल्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने त्याला सिडकोतीलच गोविंद कॉलनीच्या झाडीत जखमी अवस्थेत पकडले आहे. नांदेड शहरानजीकच्या पावडेवाडी आणि सिडकोमध्ये लागोपाठ घडलेल्या खुनाच्या या घटनेमुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले होते.
सिडकोतील संभाजी चौकात जुन्या वादातून शुभम किशन भद्रे या २३ वर्षीय युवकास ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी जुन्या वादातून साईनाथ सुभाष वट्टमवार याने लाथा, बुक्क्याने जबर मारहाण केली होती. या मारहाणीत शुभम भद्रे हा युवक गुरुवारी रात्री विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात मरण पावला होता. या घटनेतील आरोपी साईनाथ वट्टमवार पळून गेला होता. त्याचा ग्रामीण पोलीसांसह स्थानिक गुन्हा शाखेकडूनही शोध सुरू होता. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधासाठी माहितीगार अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेतला जात होता. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल घोगरे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे आणि पोलीस अंमलदारांचे पथक तयार केले होते.
सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल घोगरे, उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी त्यांच्या पथकातील अंमलदारासह गुन्हा घडल्यापासून अथक परिश्रम घेऊन गोपनीय बातमीदार नेमून गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून आणि सायबर सेलने पुरविलेल्या तांत्रिक माहितीवरून सदर गुन्ह्यातील आरोपी साईनाथ वट्टमवार हा सिडकोतीलच गोविंद कॉलनीच्या मागे असलेल्या झाडीमध्ये लपवून बसला असल्याची माहिती मिळवली. या माहितीनुसार साईनाथ वट्टमवार याचा शोध घेतला शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास जखमी अवस्थेत साईनाथ सुभाष वट्टमवार याला जेरबंद केले आहे. यावेळी त्याच्या मानेवर उजव्या बाजूने बँडेज पट्टी आणि शर्टावर रक्तासारखे डाग आढळून आले. स्थानिक गुन्हा शाखेच्या या पथकात पोहेकॉ रवि बामणे, पोकॉ अकबर पठाण, अजहर शेख, चंद्रकांत स्वामी, अनिल बिरादार यांच्यासह खंडणी विरोधी पथकातील पोकॉ राजीव बोधगिरे, संतोष पावडे, विठ्ठल वैद्य, गोविंद राठोड, आणि सायबर सेलमधील राजेंद्र सिटीकर यांचा समावेश होता. दरम्यान, इतवारा उपविभागीय अधिकारी प्रशांत शिंदे यांनीही या घटनेच्या तपासात शुक्रवारी घटनास्थळावर भेट देऊन गुन्ह्याची माहिती घेतली. तसेच तपासाच्या सूचना दिल्या होत्या.
या प्रकरणात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिबंधक अधिनियम कायदाही कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात घटनेच्या २४ तासाच्या आत स्थानिक गुन्हा शाखेने आरोपी साईनाथ वट्टमवार याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाचे कौतुक केले आहे.



