
नांदेड – स्वस्त धान्य दुकानदाराला चार महिन्याच्या धान्य वितरणापोटी मिळालेल्या कमिशनच्या दहा टक्के रक्कम आणि नोव्हेंबर महिन्याचे धान्य इ पॉज मशीनवर अपलोड करण्यासाठी ५ हजार ७०० रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या हदगावच्या नायब तहसीलदार तथा पुरवठा विभागातील निरीक्षण अधिकारी सुमन संभाजी कऱ्हाळे आणि कंत्राटी संगणक डेटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद आप्पाराव जाधव यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २२ नोव्हेंबर रोजी सापळा रचून पकडले. त्यांच्याविरुद्ध हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हदगाव येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराला गेल्या चार महिन्याचा जो धान्य पुरवठा झाला होता. त्याचे कमिशन म्हणून ५७ हजार रुपये मिळाले होते. त्याचवेळी नोव्हेंबर २०२५ चे धान्यही प्राप्त झाले आहे. पुरवठा निरीक्षकांनी ते ई पॉज या मशीनवर अपलोड केले नव्हते. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदाराला पुढील धान्य वाटप करता येणार नव्हते तसेच नवीन २७ लाभार्थ्यांचे नावही ऑनलाईन करायचे होते. यासाठी १८ नोव्हेंबर रोजी स्वस्त धान्य दुकानदाराने पुरवठा विभागाच्या निरीक्षक सुमन कऱ्हाळे यांची हदगाव तहसील कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी नायब तहसीलदार कऱ्हाळे यांनी त्यांचे कंत्राटी संगणक डेटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद जाधव यांना बोलावून स्वस्त धान्य दुकानदाराला नोव्हेंबर २०२५ चे धान्य इ पॉज मशीनवर अपलोड करण्यासाठी, २७ नवीन लाभार्थ्यांचे नाव ऑनलाईन करण्यासाठी तसेच कमिशनपोटी शासनाकडून मिळालेल्या ५७ हजार रुपयांच्या २० टक्के रकमेची लाच मागितली. गोविंद जाधव यांनीही तीच मागणी केली. या प्रकरणात तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाच लूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
या तक्रारीवरून २२ नोव्हेंबर रोजी रचलेल्या सापळ्यात पुरवठा निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे यांनी स्वस्त धान्य दुकानदार तसेच तक्रारदार यांच्याकडून ५ हजार ७०० रुपये लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवली. कंत्राटी संगणक डेटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद जाधव यांच्याकडे ही रक्कम देण्यास सांगितली. तेव्हा कंत्राटी ऑपरेटर जाधव याने तक्रारदाराकडून स्वतःसाठी आणि पुरवठा निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे यांच्यासाठी ही लाच स्वीकारली. या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे यांच्यासह कंत्राटी ऑपरेटर गोविंद जाधव या दोघांनाही पकडले. या कारवाईत त्यांचे मोबाईल आणि मतदान ओळखपत्र ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७, ७- अ, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी तहसीलदार सुमन कऱ्हाळे आणि जाधव या दोघांनाही ताब्यात घेतले. हा सापळा लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रशांत पवार, पोलीस निरीक्षक प्रीती जाधव, पोहेकॉ अर्शद अहमद खान, गजानन राऊत, सय्यद खदीर यांनी यशस्वी केला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अर्चना करपुडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.



