
नांदेड – नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या नव्या राजकीय समीकरणाचा उदय होण्यापूर्वीच त्याचा ११ दिवसातच अस्त झाल्याची बाब पुढे आली आहे. जिल्ह्यात १२ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीने ‘सम समान सन्मान’ च्या भूमिकेवर एकत्र येण्याची घोषणा ११ नोव्हेंबर रोजी केली होती. मात्र या निवडणुकीत जागा वाटपावरून बिनसल्याने ११ दिवसातच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात फाटाफूट झाली आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने नेमलेल्या निवडणूक समितीचे समन्वयक अविनाश भोसीकर यांनी आता यासंदर्भात खुलासा करण्यासाठी रविवारी पत्रकार परिषद बोलावली आहे. त्या पत्रकार परिषदेत अधिक खुलासा केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यात धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी जिल्ह्यातील बारा नगरपालिका आणि एका नगरपंचायतीची निवडणूक एकत्र लढवणार अशी घोषणा ११ नोव्हेंबर रोजी काँग्रेसचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर, राजेश पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद, महासचिव श्याम कांबळे, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. या घोषणेनंतर नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात सकारात्मक पडसाद उमटले होते. ही आघाडी गरजेची होती, असेही सांगण्यात आले होते; मात्र अकरा दिवसातच या आघाडीला छेद बसला आहे. ‘सम समान सन्मान’ या धोरणाला छेद दिल्यामुळे ही आघाडी प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंतही टिकू शकली नाही, हे स्पष्ट झाले आहे.
वंचित बहुजन आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एक निवडणूक समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये नांदेड जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे. या समितीमध्ये समन्वयक म्हणून अविनाश भोसीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी शनिवारी समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये काँग्रेस आणि वंचितची आघाडी तुटली असल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात रविवारी होणाऱ्या एका पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या निवडणूक समितीतील सदस्य फारूक अहमद, श्याम कांबळे यांनी या बाबींना बाबीला दुजोरा दिला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणाचा उदय होण्यापूर्वीच अस्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या राजकीय आघाडीमध्ये बिघाड होण्याचे प्रमुख कारण हे जागावाटप ठरले आहे. नगरपालिकांच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे वंचित बहुजन आघाडीला जागा न सोडल्यामुळे काँग्रेस सोबतची ही आघाडी फिस्कटली असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत आता रविवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत नेमके कोणती कारणे दिले जातील याबाबतही चर्चेला चर्चा सुरू झाली आहे.
वंचितचे दोन नगराध्यक्षांसह एकूण ३५ उमेदवार रिंगणात…नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे दोन नगराध्यक्ष पदासह एकूण ३५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. एकूणच वंचित बहुजन आघाडीची ही भूमिका आगामी काळात काँग्रेसला हितकारक ठरेल की भाजपाला ठरेल ते स्पष्ट होणार आहे. अकरा दिवसाच्या या आघाडीतून दोन्ही पक्षांनी स्वतःचे हसेच करून घेतले आहे. निवडणुकीपर्यंतही आघाडी टिकू शकली नाही भविष्यातील मोठ्या राजकारणाची नांदी या आघाडीतून मिळाली असल्याचे काही विश्लेषक सांगत होते; मात्र त्याला छेद बसला आहे. वंचित बहुजन आघाडीमध्येच काँग्रेससोबत जाण्याच्या भूमिकेला विरोध होता. तो विरोध डावलून ही आघाडी करण्यात आली होती. या गाडी अल्पकाळात तुटली. त्यामुळे विरोध करणाऱ्यांची भूमिका ही योग्य होती, असेच स्पष्ट झाले आहे.



