राजकीय

नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडी फिस्कटली..!

काँग्रेसने केसाने गळा कापल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप, काँग्रेस खासदाराने शेवटपर्यंत ठेवले झुलवत, १३ पैकी ११ नगरपालिकेत वंचितला एकही जागा सोडली नाही..! 

नांदेड – नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसने १३ पैकी ११ नगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीला एकही जागा सोडली नाही. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात काँग्रेससोबतची आघाडी तुटली असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे निवडणूक समन्वयक अविनाश भोसीकर यांनी पत्रकार परिषदेत केली. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीचा केसाने गळा कापल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

नांदेडमध्ये ११ नोव्हेंबर रोजी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या घोषणेबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत समसमान सन्मानच्या भूमिकेत ही आघाडी होत असल्याचे वंचित बहुजन आघाडीकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला अखेरपर्यंत झुलवत ठेवण्यात आले. काँग्रेसचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना शेवटपर्यंत आम्ही जागा सोडू असे सांगितले; मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत हा प्रकार सुरू राहिला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला उमेदवार असूनही रिंगणात उतरवता आले नसल्याचे भोसीकर म्हणाले.

नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत २७५ पैकी समान जागेनुसार वंचित बहुजन आघाडीला १३५ ते १४० जागा मिळावयास हव्या होत्या; मात्र या जागा सोडल्या नाही. १४० तर सोडा ४० जागाही सोडल्या नाही. १३ पैकी ११ नगरपालिकेमध्ये एकही जागा वंचित बहुजन आघाडीला सोडली नाही. बिलोली आणि कंधार वगळता वंचित बहुजन आघाडीला एकाही जागी काँग्रेसने साथ दिली नाही. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यात ३६ उमेदवार उभे केले आहेत. या ३६ जागावर तरी काँग्रेसने आपले उमेदवार मागे घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती; मात्र त्याकडेही काँग्रेस नेतृत्वाने दुर्लक्ष केले. परिणामी ही आघाडी आता संपुष्टात आल्याचे या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. बिलोली आणि कंधार नगरपालिकेतील आघाडीबाबत पक्ष नेतृत्वाला अहवाल सादर केला आहे. त्यावर पक्ष नेतृत्व अंतिम निर्णय घेईल असेही भोसीकर यांनी सांगितले.

काँग्रेसने केला विश्वासघात..!                               वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस आघाडीची घोषणा ११ नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर प्रत्येक दिवशी काँग्रेससोबत चर्चा सुरू होती. काँग्रेसचे खा. प्रा. रवींद्र चव्हाण हे संपर्कात होते. त्यांनी प्रारंभी सकारात्मक प्रतिसाद दिला; मात्र शेवटी त्यांनी झुलवत ठेवण्याचे काम केले. अखेरपर्यंत त्यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना आपण जागा सोडू असे सांगितले; मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत काँग्रेसच्या उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध आपले अर्ज कायम ठेवले. त्यामुळे काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीचा केसाने गळा कापला आहे. काँग्रेस आणि भाजपाकडून वंचित बहुजन पक्षाला संपविण्याचा डाव रचला असल्याचे ते म्हणाले;  मात्र वंचित बहुजन आघाडी तो डाव हाणून पाडेल. आगामी काळाटी निवडणुकीत मोठ्या आव्हानाला वंचित बहुजन आघाडी सामोरे जाईल असेही भोसीकर यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे खासदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आजही माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या संपर्कात असल्याचे भोसीकर म्हणाले. त्यांच्याच प्रभावाखाली काँग्रेसचे नेते आजही काम करत आहेत. काँग्रेसचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांचे आजही माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे सलोख्याचे संबंध असल्यानेच काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी युती करायची नव्हती,  असा आरोपही भोसीकर यांनी केला.

वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती…वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या आघाडी संदर्भात पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते; मात्र काँग्रेससोबत काडीमोड घेताना वंचितचा एकही पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हता. वंचित बहुजन आघाडीने स्थापन केलेल्या निवडणूक समितीचे समन्वयक अविनाश भोसीकर यांनी एकट्याने या आघाडीच्या काडीमोडाची माहिती दिली. याबाबत निवडणूक समितीतील इतर पाच सदस्यांपैकी एकही सदस्य उपस्थित नसल्याबाबत भोसीकर यांना विचारले असता इतर पदाधिकारी हे प्रचाराच्या कामामध्ये गुंतले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात वंचित बहुजन आघाडीचे इतर पदाधिकारी हे नांदेडमध्येच होते; मात्र त्यांनी या पत्रकार परिषदेकडे पाठ फिरवली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यातील बेबनावही यानिमित्ताने पुढे आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!