
नांदेड – नांदेड जिल्ह्यात आज मंगळवारी १० नगर परिषदा आणि एका नगर पंचायतीसाठी मतदान होत आहे. नगराध्यक्ष पदासाठी ७१ तर नगरसेवक पदासाठी ८७३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मतदानासाठी २९१ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या निवडणुकीत २ लाख ४५ हजार ४९४ मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावतील. मतदानाच्या पहिल्या दोन तासात ७.६९ टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यात १८ हजार ८०८ मतदारांनी आज सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. या निवडणुकीत मतदारांनी निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
जिल्ह्यात आज सकाळी साडेसात वाजता २९१ मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यात पहिल्या दोन तासात सर्वाधिक ११.८७ टक्के मतदान हे हिमायतनगर नगरपंचायतीसाठी झाले. येथे २ हजार १७ मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. देगलूर नगर परिषदेत ८.८९ टक्के, बिलोली ९.९ टक्के, कुंडलवाडी ८.६२, उमरी ५.३१, मुदखेड ७.४१, भोकर ६.८८, किनवट ५.६१, हदगाव ५.६०, लोहा ७.९२ टक्के आणि कंधार नगर परिषदेसाठी ७.३६ असे एकूण जिल्ह्यात ७.६९ टक्के मतदान झाले आहे. आतापर्यंत १८ हजार ८०८ मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावला आहे. त्यामध्ये १० हजार ५८० पुरुष मतदारांचा तर ८ हजार २२८ महिला मतदारांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आज उमरी, हदगाव, मुदखेड, देगलूर, किनवट, बिलोली, भोकर, कुंडलवाडी, लोहा, कंधार या नगरपरिषदांची तर हिमायतनगर नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया होत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी २९१ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. १२१ प्रभागासाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे ७१ तर नगरसेवक पदासाठी ८७३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत २ लाख ४५ हजार ४९४ एकूण मतदार आहेत. त्यामध्ये १ लाख २४ हजार ३५६ महिला मतदार तर १ लाख २१ हजार १२२ पुरुष मतदारांचा समावेश आहे. इतर मतदारांची संख्या १६ आहे.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान होत असलेल्या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १ हजार ७८ व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अपर पोलीस अधीक्षक, १३ उपविभागीय पोलीस अधिकारी, १३७ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, १ हजार ६९१ पोलीस अंमलदार, १ हजार ३५० होमगार्ड तसेच सहा प्लाटून दंगा नियंत्रण पथक, पाच प्लाटून राज्य राखीव पोलीस बल, सहा जलद प्रतिसाद पथक, २० स्ट्रायकिंग असे पोलीस बळ तैनात करण्यात आले आहे. मतदान होत असलेल्या ठिकाणी अथवा जिल्ह्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेबाबत तक्रार असल्यास डायल – 112 किंवा जवळच्या पोलीस ठाण्याकडे तक्रार करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे.



