नांदेड स्क्रिप्ट विशेष

नांदेड महापालिका प्रशासन इलेक्शन मोडवर ..!

आयुक्तांनी घेतली मॅरेथॉन बैठक, स्ट्रॉंग रूम, ईव्हीएम कक्षासह आरओ ऑफिस, मतदान केंद्रांचीही केली पाहणी, जिल्हा परिषदेपूर्वी महापालिका निवडणुका होण्याचे संकेत 

नांदेड – राज्यातील जिल्हा परिषदेच्या आरक्षण प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात जिल्हा परिषद निवडणुका लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुका जिल्हा परिषदेच्या आधी होतील ही बाब लक्षात घेता नांदेड महापालिका आता इलेक्शन मोडवर आली आहे. निवडणुकीचे संकेत मिळताच महापालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांनी आता युद्ध पातळीवर निवडणूक तयारी सुरू केली आहे. सोमवारी आयुक्तांनी महापालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांची मॅरेथॉन बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रिय कार्यालयांना भेट देऊन पाहणीही केली.
नांदेड महापालिकेचे आरक्षण हे ५० टक्क्यांच्या आत आहे. राज्यात केवळ दोन महापालिकांनी आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे. जिल्हा परिषदेतच्या आरक्षणाची परिस्थिती पाहता नांदेडसह राज्यातील १७ जिल्हा परिषदेची फेर आरक्षण सोडत काढावी लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबतील, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता राज्यात जिल्हा परिषदेपूर्वी महापालिका निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत प्रशासकीय पातळीवरही तयारी केली जात आहे. महापालिका निवडणुका प्रारंभी होत होण्याचे संकेत मिळाल्यानंतर नांदेडमध्ये महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सोमवारी महापालिकेत निवडणूक तयारीची मॅरेथॉन आढावा बैठक घेतली. यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या विविध कक्ष, त्या कक्षात नियुक्त अधिकारी यांची माहिती घेण्यात आली. महापालिका मतदार यादी बाबतही चर्चा झाली. त्याचवेळी निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक त्या तयारीसाठी सर्व निविदा प्रक्रिया कोणत्या स्तरावर आहेत, याबाबतही आढावा घेण्यात आला.
निवडणुकीसाठी महापालिकेला जवळपास ४ हजार २०० अधिकारी, कर्मचारी आवश्यक आहेत. त्यापैकी ३ हजार ६०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपलब्धता निश्चित करण्यात आली आहे. महापालिकेच्या मतदानासाठी जवळपास ६०० मतदान केंद्र आवश्यक आहेत. आवश्यक खबरदारी म्हणून ७०० मतदान केंद्राची तयारी करण्यात आली आहे. एका मतदान केंद्रावर ८५० मतदान मतदारांना मतदान करता येईल. त्याचवेळी प्रभाग क्रमांक २० मध्ये मात्र एका मतदान केंद्रावर ७५० मतदार मतदान करू शकतील, अशी तयारी केली जात आहे. ईव्हीएम मशीन तसेच स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्राचा आढावाही घेण्यात आला आहे.

निवडणुकीसाठी ७ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय… महापालिकेच्या २० प्रभागात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय राहणार आहेत. या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचीही पाहणी आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी सोमवारी केली. यावेळी अप्पर अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, निवडणूक उपायुक्त नितीन गाढवे यांच्यासह क्षेत्रिय अधिकारी, इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.  त्या त्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाची पाहणी करण्यात आली आहे. एकूणच आता महापालिका निवडणुकांची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका या जिल्हा परिषदेपूर्वी होतील, अशीच स्पष्ट चिन्ह दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!