
नांदेड – नांदेड महापालिकेच्या रणधुमाळीत प्रचाराचा समारोप मंगळवारी सायंकाळी झाला. त्यानंतर अवघ्या काही तासातच काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह नांदेडचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली. या घटनेचा पोलिसांनी सखोल तपास करावा अशी सूचनाही त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे.
नांदेड महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत नांदेड शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर भाजपाच्या दोन्ही खासदारांनी बोट ठेवले आहे. शहरात गुन्हेगारी वाढली असल्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी नमूद केले होते. भाजपाने घेतलेल्या बुद्धिवंतांच्या बैठकीत शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर चिंता व्यक्त करण्यात आली होती. ही परिस्थिती सांभाळण्याची जबाबदारी संबंधित विभागासह स्थानिक प्रशासनाची असल्याचे स्पष्ट करत माजी मुख्यमंत्री खासदार चव्हाण यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. या बाबीस काही कालावधी उलटला असताना आणि महापालिका प्रचाराचा समारोप मंगळवारी सायंकाळी झाल्यानंतर काही वेळातच महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील काँग्रेसच्या उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव यांच्यावर तरोडा खुर्द भागातील त्यांच्या बेलानगर येथील निवासस्थानी तीन दुचाकीवरून आलेल्या आलेल्या हल्लेखोरांनी तलवारीने हल्ला केला. हा हल्ला नेमका कशासाठी झाला हे पोलिसांनी स्पष्ट केले नाही. या घटनेबाबत भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि नांदेड शहर उपविभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या आल्यानंतर भयभयीत झालेल्या शिवाजी भालेराव यांनी आम्हाला निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही काय? गुन्हेगारीवर आळा घातला जाईल का? असा सवाल उपस्थित केला आहे.
काँग्रेसचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांनीही या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना आमच्या उमेदवारांचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याचा आरोप केला आहे; मात्र आम्ही या निवडणुकीत सक्षमपणे उभे असल्याचेही ते म्हणाले. अशा हल्ल्यामुळे आमचा आत्मविश्वास कमी होणार नसून आम्ही या दडपशाहीला भीक घालणार नसल्याचेही सांगितले. महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मिळत असलेला उत्तम प्रतिसाद पाहता विरोधकांकडून असे प्रकार केले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या संदर्भात पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. याबाबत आपण स्वतः पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.



