शैक्षणिक

अंबुलग्याचे माणिक प्रभू उच्च माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्र रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची शिफारस केंद्रावर 

इयत्ता बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी ड्युअल डेस्क नाहीत,  प्रश्नपत्रिका सीसीटीव्हीच्या निगराणीखाली सुरक्षितरित्या जमा न केल्याची गंभीर बाबही आली निदर्शनास     

नांदेड – इयत्ता बारावी परीक्षा दरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सोमवारी कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील माणिक प्रभू उच्च माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्रास भेट दिली असता परीक्षार्थींना बसण्यास ड्युअल डेस्क नसणे, पर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकांकडे ओळखपत्र नसणे यासह उरलेल्या परीक्षा प्रश्नपत्रिका मानक कार्यप्रणालीनुसार सीसीटीव्हीच्या निगराणीखाली  सुरक्षितरित्या जमा न करण्याच्या गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. या सर्व बाबी पाहता केंद्र प्रमुखास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून हे केंद्र बंद करण्याची शिफारसही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केली आहे.
इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षा कालावधीत आज सोमवारी भौतिकशास्त्र विषयाचा पेपर पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील माणिक प्रभु उच्च माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्राला अचानक भेट दिली. भेटीदरम्यान उरलेल्या प्रश्नपत्रिका मानक कार्यप्रणालीनुसार (SOP) सीसीटीव्हीच्या निगराणीखाली सुरक्षितरित्या जमा न केल्याची गंभीर त्रुटी आढळून आली. तसेच परीक्षेचे पर्यवेक्षण करणाऱ्या काही शिक्षकांनी आपले ओळखपत्र जवळ न ठेवल्याची बाबही निदर्शनास आली. या अनियमिततेसंदर्भात संबंधित केंद्रप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. याशिवाय विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आवश्यक ड्युअल डेस्कची व्यवस्था नसल्याचेही आढळून आले. ही बाब अत्यंत गंभीर असून, संबंधितांवर कडक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या आहेत. तसेच संबंधित परीक्षा केंद्र रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात ११२ केंद्रांवर सुरू असलेल्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अनेक संवेदनशील केंद्रांवर बैठे पथकांमार्फत निगराणी ठेवण्यात येत आहे. झूम वेबकास्टद्वारे संपूर्ण वेळ परीक्षेचे थेट नियंत्रण करण्यात येत असून त्यासाठी दोन स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. इयत्ता १२ वी व १० वीच्या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी सीसीटीव्ही व ड्रोनच्या माध्यमातूनही चित्रीकरण करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!