क्राईम

नांदेडमध्ये घरफोडी प्रकरणाचा अवघ्या बारा तासात भाग्यनगर पोलिसांनी केला उलगडा..!

फिर्यादीने रचलेल्या बनावाचाही केला पर्दाफाश, जवळच्याच महिलांनी १२ लाख ५० हजारांसाठी मित्रांना सोबत घेत रचला होता डाव..!

नांदेड – सोबत काम करणाऱ्या एका महिलेच्या घरात १२ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती मिळाल्यानंतर तीन महिलांनी आपल्या मित्रांना सोबत घेऊन चोरीचा डाव रचला खरा.. मात्र १२ लाख ५० हजार रुपये हाती लागले नाहीतच; पोलिसांच्या बेड्या मात्र त्यांच्या हाती पडल्या. दुसरीकडे याच घरफोडीत १२ लाख ५० हजार रुपये चोरीस गेल्याची तक्रार फिर्यादीने पोलिसांकडे दिली खरी; मात्र तपासामध्ये हे १२ लाख ५० हजार रुपये चोरीस गेलेच नव्हते, ही बाबही पुढे आली आहे. त्यामुळे पाच आरोपीसह फिर्यादीलाही या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी आरोपी केले आहे. अतिशय किचकट प्रकरणाचा भाग्यनगर पोलिसांनी अवघ्या बारा तासात छडा लावला आहे.
भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीत १५ फेब्रुवारी रोजी घरफोडी झाल्याची तक्रार करण्यात आली होती. हा गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक विनोद देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय माहितीच्या आधारे घरफोडीतील आरोपी हे तुळजापूर येथे गेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती आणि सायबर सेलच्या तांत्रिक पद्धतीने आरोपींचा शोध घेऊन तुळजापूर देवस्थानाच्या बाहेर दोन पुरुष आणि तीन महिला यांना पकडण्यात आले. त्यामध्ये आनंद नामदेवराव जाधव वय २७ वर्ष, रा. काबरानगर, नांदेड, राजेश लक्ष्मण पांचाळ वय २३ वर्षे, रा. सिडको, पूजा दीपक नरवडे वय २७ रा. काबरानगर, स्मिता लक्ष्मण पौळ वय २८ रा. संभाजीनगर, कॅनॉल रोड आणि संध्या किशनराव डोनगे वय २९ रा. संभाजीनगर, कॅनॉल रोड नांदेड यांचा समावेश होता.
या पाच आरोपींची पोलिसांनी चौकशी केली त्यांनी घरपोडी केल्याचे सांगत सोन्या – चांदीचे तसेच बेन्टेक्सचे दागिने आणि हातातील घड्याळ चोरल्याची कबुली दिली; मात्र १२ लाख ५० हजार रुपये चोरले नाही असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तपासात आरोपी तसेच फिर्यादी मंगल पोशेट्टी जंगिलवाड यांना विचारणा केली.  तपासांती फिर्यादी मंगलनेच १२ लाख ५० हजार रुपये तिची आई विमलबाई लंकनवाड रा. ब्राह्मणगाव ता. उमरखेड यांच्या घरी यापूर्वीच नेऊन ठेवले असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्याचा तपासात सदरचे पैसे फिर्यादीची आई यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.
फिर्यादी मंगलनेच १२ लाख ५० हजार रुपये चोरीस गेल्याचा बनाव केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे फिर्यादी मंगल जंगिलवाड वय ४० वर्षे रा. कासराळी, ता. बिलोली हल्ली मुक्काम संभाजीनगर, कॅनॉल रोड यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात  रोख १२ लाख ५० हजार रुपये, ७ ग्राम सोने, २० तोळे चांदी, बेन्टेक्सचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली कार, स्कुटी असा एकूण १९ लाख ६१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पोलीस निरीक्षक महेश माळी, उपनिरीक्षक विनोद देशमुख, नरेश वाडेवाले, पोहेकॉ विशाल माळवे, गजानन किडे, पोकॉ विष्णुकांत मुंडे, राहुल लाटकर, नागनाथ चापके, राजीव घुले, अदनान पठाण, अंकुश कांबळे, महिला पोहेकॉ सविता केळगंद्रे तसेच सायबर सेल नांदेड येथील पोहेकॉ राजेंद्र सिटीकर, दीपक ओढणे यांनी केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भाग्यनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदार यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!