शैक्षणिक

नांदेडमध्ये बारावी परीक्षेत अख्खे बैठे पथक, केंद्रसंचालक अन् मुख्याध्यापकही निलंबित..!

बैठे पथक परीक्षेच्या नियंत्रणासाठी केंद्रावर आलेच नाही, एका ठिकाणी होता गैरप्रकार सुरू, परीक्षार्थींना न तपासताच सोडले केंद्रात, पोलिस बंदोबस्ताचीही केली नाही मागणी

  • नांदेड – नांदेडमध्ये बारावी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल यंत्रणा तसेच इतर विभागांची ही मोठ्या प्रमाणात मदत घेतली जात आहे; मात्र या परीक्षा नियंत्रणासाठी इतर विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून हवे तसे सहकार्य अथवा विषयाचे गांभीर्य ठेवले जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. उमरी येथील नूतन उच्च माध्यमिक विद्यालय या केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले बैठे पथक केंद्रावर आलेच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येतात या संपूर्ण पथकाला निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.
बुधवारी इयत्ता १२ वीचा सकाळ सत्रातील रसायनशास्त्र विषयाचा पेपर होता. परीक्षेत जिल्ह्यातील १०९ केंद्रांवर बैठे पथकामार्फत झूम वेबकास्टद्वारे पूर्णवेळ परीक्षेचे नियंत्रण करण्यात आले होते. बुधवारी उमरी तालुक्यातील नूतन उच्च माध्यमिक विदयालय येथील परीक्षा केंद्रावर नियुक्त बैठे पथक प्रमुख व सदस्य गैरहजर असल्याची बाब उघडकीस आली. या बैठे पथकाचे प्रमुख, विस्तार अधिकारी कृषी नरहरी मुंजाळ, बैठे पथक सदस्य केंद्रप्रमुख मोहन भोसले, ग्राम महसूल अधिकारी पांडूरंग गुब्रे हे बैठै पथकातील सदस्य यांचा समावेश होता. केंद्रावर गैरहजर राहण्याबाबत त्यांनी कोणतीही पुर्वसूचना दिली नाही. यामुळे या सर्व संबंधितांना परीक्षा कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून कर्तव्यात कसूर केल्याने सेवेतून निलंबीत करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांना निर्देश जिल्हाधिकारी कर्डीले यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात प्रत्येक केंद्रांवर बैठे पथकामार्फत झूम वेबकास्टद्वारे तसेच ड्रोन आणि व्हिडीओ कॅमेराद्वारे पूर्णवेळ परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यात आले होते. यामुळे किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथील स्व.संगितादेवी उच्च माध्यमिक आश्रमशाळा या परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आला. सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी झेनित चंद्र दोंतुला यांनी त्याचेविरुध्द मंडळ नियमाप्रमाणे कारवाई करुन तसा अहवाल मंडळाकडे पाठविला.  सदर केंद्रावर मंडळाच्या निर्देशाप्रमाणे तसेच कॉपीमुक्त अभियानाचा भाग म्हणून उर्वरीत प्रश्नपत्रिका सीसीटीवीच्या निगराणीत ठेवल्या नाहीत, परीक्षार्थ्यांना व्यवस्थित तपासून सोडले नाही, अधिकचा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला नाही यास संबंधित केंद्रसंचालक गुटटे यांना जबाबदार धरून त्यांना निलंबीत करण्यासाठी संबंधित शाळा व्यवस्थापनास निर्देश दिले आहेत. स्व.संगिता देवी उच्च माध्यमिक आश्रमशाळा याच केंद्रावर मूळ मुख्याध्यापक पांडूरंग आडे यांनी सदर केंद्र परिसरात आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाहीत. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे संबंधितांना सेवेतून निलंबीत करण्यासाठी संचालक, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, नांदेड यांना कळविले आहे.कंधार तालुक्यातील पेठवडज येथील संत नामदेव महाराज कनिष्ठ महाविदयालय या परीक्षा केंद्रावर दोन विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आले. त्यामुळे उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांनी त्यांचेविरुध्द मंडळ नियमाप्रमाणे कारवाई करुन तसा अहवाल मंडळाकडे पाठविला आहे. तसेच संबंधित दहेली तांडा व पेठवडज येथील केंद्रसंचालकांना तडकाफडकी बदलून इतर केंद्रसंचालकांची त्यांचे जागेवर नियुक्ती केली आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे.

आज बुधवारी सकाळच्या रसायनशास्त्र पेपरला एकूण २४ हजार ४०६ परीक्षार्थ्यांपैकी २४ हजार ७३ परीक्षार्थी उपस्थित होते.  उपस्थितीची टक्केवारी ९८.६४ होती. तर दुपारच्या राज्यशास्त्र पेपरसाठी एकुण १३ हजार २०७ परीक्षार्थ्यांपैकी १२ हजार ५९४ विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!