नांदेड – नायगाव तालुक्यातील रातोळी गावातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना घडली. मंदिरातील देवाच्या चांदीच्या दागिन्यांमध्ये सुमारे ६५ तोळ्यांचा एक मुकुट, ३३ तोळ्यांचा दुसरा मुकुट, ३ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच कपाटातील सुमारे ३० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
नायगाव तालुक्यातील या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने श्वान पथकाला पाचारण केले. श्वान ‘कोको’ हिला कपाटाची चावी व कपाटाच्या ड्रॉवरचा वास दिल्यानंतर तिने मंदिर परिसरातून वास घेत पूर्वेकडे सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत माहेगाव–कार्ला रोडपर्यंत धाव घेतली. तेथे ती गोल फिरून सतत भुंकू लागली. यावरून चोरटे त्या ठिकाणाहून वाहनाच्या सहाय्याने पसार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तपास कार्यादरम्यान श्वान पथक प्रमुख महमद आयुब, पोहेका दत्ता गायकवाड तसेच बीट जमादार बालाजी शिंदे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. विशेष म्हणजे, मंदिरात प्रवेश करताच श्वान ‘कोको’ हिने भगवान विठ्ठल-रुक्मिणी यांना नमस्कार करून अभिवादन केल्याने उपस्थित ग्रामस्थांमध्ये कौतुकाची भावना व्यक्त झाली.
या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.