
नांदेड – नांदेड शहरातील तरोडा बु. भागातून चोरट्यांनी एसबीआय बँकेचे चक्क एटीएमच मशीनच लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी एका वाहनातून हे एटीएम मशीन पळवले आहे. या एटीएम मशीन चोरीच्या तपासासाठी पोलीस भाग्यनगर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या सहा पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली आहेत. ६ लाख ७३ हजार ५०० रुपये असलेले एटीएम मशीन घेऊन चोरटे वसमतमार्गे फरार झाल्याची माहिती पुढे आली आहे.
शहरातील चैतन्यनगर भागात असलेल्या शिवमंदिर ते तरोडा बुद्रुक जाणाऱ्या रस्त्यावर संकेत हॉस्टेलजवळ नागेश कॉम्प्लेक्समध्ये असलेले एसबीआयचे एटीएम चोरट्यांनी फोडल्याचे मंगळवारी सकाळी स्पष्ट झाले. अधिक माहिती घेतली असता चोरटे एटीएम मशीनच चोरून नेल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली. ही बाब स्थानिक नागरिकांनी भाग्यनगर पोलिसांना कळवली. माहिती मिळताच घटनास्थळी नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने, भाग्यनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष तांबे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी, फॉरेन्सिक लॅब पथक, डॉग स्कॉड पोहोचले.
पोलिसांनी दिवसभर या चोरीचा कसून तपास सुरू केला आहे त्याचवेळी भाग्यनगर पोलीस तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे सहा पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके वेगवेगळ्या दिशेला रवाना झाली आहेत. त्याचवेळी तीन ते चार चोरट्यांनी पिकअप या मालवाहू वाहनातून एटीएम मशीन वसमतमार्गे नेल्याची बाब पुढे आली आहे.
एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरा बंद..! रेकॉर्डवरील एटीएम चोरट्यांचा शोध सुरू… तरोडा बुद्रुक भागातील नागेश कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एसबीआयच्या एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याची बाबही पुढे आली आहे. त्याचवेळी या एटीएम शेजारी असलेला सीसीटीव्ही कॅमेरा चोरट्यांनी बंद केला अन् एटीएम मशीन पळवली. चोरटे आता पहिल्यांदा सीसीटीव्ही कॅमेराला लक्ष्य करत असल्याचीही बाब वेगवेगळ्या घटनांमधून पुढे येत आहे. त्याचवेळी चक्क एटीएम मशीन पळवून नेणे हा प्रकार पोलीस कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हच निर्माण करणारा ठरला आहे. आता प्रकरणाच्या तपासात पोलिसांना कितपत यश येते याकडेही लक्ष लागले आहे. पोलिसांनी एटीएम फोडणारे, एटीएममध्ये चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचाही शोध सुरू केला आहे. यातूनच पोलीस आता या एटीएम तपास चोरीची लिंक लावणार आहेत. वेगवेगळ्या तांत्रिक बाबींच्या आधारेही तपास केला जात आहे.
एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरा बंद..! रेकॉर्डवरील एटीएम चोरट्यांचा शोध सुरू…


