क्राईम

नांदेड बसस्थानकासह अनेक प्रार्थना स्थळांमध्ये होणार बॉम्बस्फोट..!

दहशतवाद विरोधी पथकासह विविध सेल तातडीने झाले होते ॲक्टिव्ह, मनोरुग्णाने नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयाला केला फोन कॉल अन् सांगितले बस स्थानकाच्या तक्रार पेटीमध्ये ठेवली बॉम्ब ब्लास्टच्या माहितीची चिट्ठी

नांदेड – नांदेड मध्यवर्ती बसस्थानकासह शहरातील काही भागात असलेल्या प्रार्थना स्थळांमध्ये शुक्रवारी बॉम्ब स्पोट होणार असल्याची माहिती देणारा फोन कॉल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला येतो आणि त्यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा हादरून जाते. स्थानिक पोलीस, सायबर सेल, बॉम्ब शोध व नाशक पथक यांच्यासह दहशतवाद विरोधी पथकही तातडीने ॲक्टिव होते. चौकशीअंती हा सर्व प्रकार एका मनोरुग्णाकडून झाला असल्याची बाब स्पष्ट झाल्यानंतर यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला. फोन करणाऱ्या त्या व्यक्तीला पोलिसांनी थेट अंबाजोगाई येथून उचलले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने यापूर्वी छत्रपती संभाजीनगरसह इतर शहरांमध्येही असे फसवे कॉल केले असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हेही दाखल आहेत.
जिल्हा पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षातून वजीराबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांना माहिती मिळाली की एका अनोळखी मोबाईल धारकाने पोलीस अधीक्षक कार्यालयात लँडलाईन फोन करून ‘मी मारणे गॅंगचा शार्प शूटर असल्याचे सांगितले’. तसेच बस स्थानक येथील तक्रार पेटीमध्ये चिट्ठी टाकलेली आहे. त्यामध्ये शहरात काही भागातील प्रार्थना स्थळांमध्ये बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचेही कळवले आहे. ही बाब समजताच पोलीस निरीक्षक कदम यांनी तात्काळ वजिराबाद येथील पोलीस चौकीवरील अंमलदारांना फोन करून बस स्थानकातील तक्रारपेटी तपासण्यास सांगितले. त्यावेळी तक्रार पेटीमध्ये बॉम्ब ब्लास्टबाबत मजकूर असलेली चिट्ठी आढळून आली.
या सर्व प्रकरणाची माहिती गांभीर्याने घेत पोलीस निरीक्षक कदम यांनी एक पथक तयार केले.  चौकशीदरम्यान सदर मोबाईलधारक याचा सायबर सेलच्या मदतीने शोध घेतला असता तो अंबाजोगाई येथील असल्याचे स्पष्ट झाले. पथक अंबाजोगाई येथे तात्काळ रवाना केले. मोबाईलधारक पाणीपुरी विक्रेता होता. त्याला याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले, दुपारी त्याच्याजवळ एका अनोळखी व्यक्तीने इमर्जन्सी कॉल करायचा आहे असे सांगून त्याचा फोन घेतला होता आणि त्यावरून कॉल केला. तांत्रिक मदतीवरून आरोपीचा तपास लागत नसल्याने पाणीपुरी विक्रेत्याकडून संशयीतांचे वर्णन प्राप्त केले. वजीराबाद पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अंबाजोगाई येथील स्थानिक पोलीस स्टेशन तसेच नांदेड दहशतवाद विरोधी पथक यांच्या मदतीने कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. त्यावेळी नमूद वर्णनाचा व्यक्ती संशयितरित्या आढळून आला. त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव शेख सलीम शेख चांद पाशा वय ३५, रा. मणियार गल्ली, रविवार पेठ अंबाजोगाई, जिल्हा बीड असे त्यांनी सांगितले. त्यानेच मोबाईलवरून नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात लँडलाईन फोनवर कॉल करून  बसस्थानकातील तक्रार पेटीमध्ये चिठ्ठी टाकून माहिती दिली असल्याचे सांगितले. त्याच्याविरुद्ध पोहेकॉ बालाजी नागमवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून  वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटकही केली आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव, नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, वजीराबाद ठाण्याचे  पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू वटाणे, उपनिरीक्षक बालाजी किरवले पोहेकॉ मारुती मुसळे, शिवसांब मठपती, पोकॉ विलास कदम, किशोर जयस्वाल आदींनी पूर्ण केला.

सध्या शहरात वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आलेला कॉल गांभीर्याने घेत तातडीने कारवाई केली, आरोपीला पकडले. एकूणच हा प्रकार फसविण्याचा उद्देशाने केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि: श्वास सोडला. यापुढे अशा प्रकारची खोटी अफवा अथवा सार्वजनिक उपद्रव पसरविणाऱ्या इसमाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नांदेड दहशतवाद विरोधी पथक वजीराबाद पोलीस स्टेशन आणि सायबर सेल यांचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!