क्राईम

नांदेडमधील ‘त्या’ स्फोटाच्या चौकशीबाबत अद्यापही साशंकताच..!

पाटबंधारेनगर घटनेची पुनरावृत्ती तर नाही ना..? सेक्युलर फोरमने व्यक्त केली शंका, घटनेच्या आठ दिवसानंतरही पोलिसांकडून आरोपीबाबत कोणताही खुलासा नाही, घटनेचा तपास सीबीआय, एनआयएमार्फत करण्याची केली मागणी 

नांदेड – नांदेडमध्ये ऐन ईदच्या दिवशी घडलेल्या स्फोट प्रकरणाच्या तपासाबाबत साशंकता असल्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी सेक्युलर फोरमने शनिवारी नांदेडमध्ये एका पत्रकार परिषदेत केली. जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा प्रशासनाकडून या घटनेबाबत घटनेतील आरोपीबाबत कोणताही खुलासा आठ दिवसानंतरही केला नाही. या घटनेतील आरोपी कोण आहेत, त्यांच्या पाठीशी कोण आहेत त्यांचा उद्देश काय होता याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांकडून दडपले जाईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआय अथवा एनआयएमार्फत करावा अशीही मागणी करण्यात आली आहे.
नांदेड येथे ईदगाह मैदानाजवळ ईदच्या दिवशी घडलेल्या स्फोटानंतर पोलीस दल आणि प्रशासनाकडून घटनेच्या तपासाबाबत कोणतीही माहिती पुढे आली नाही. २१ मार्चची ही घटना नांदेडमध्ये ६ एप्रिल २००६ मध्ये घडलेल्या पाटबंधारे नगरातील बॉम्बस्फोटाची आठवण करून देणारी असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे २१ मार्च रोजी सकाळी नऊच्या सुमारास ईदगाह मैदानावर ईदच्या नमाजासाठी हजारो मुस्लिम बांधव, महिला, लहान मुले मोठ्या प्रमाणात एकत्र जमले होते. याचवेळी वाजेगाव रोड परिसरात एका मोटरसायकलस्वाराचा भीषण स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शी आणि व्हिडिओ पुराव्यानुसार संबंधित व्यक्तीने आपल्या शरीराला स्फोटके काचांच्या बाटल्या आणि लोखंडी खिळे बांधले होते. ज्यामुळे स्फोट अधिक घातक ठरला आहे. प्रार्थमिकदृष्ट्या हा प्रकार संभाव्य दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न असल्याची गंभीर शक्यताही सेक्युलर फोरमने नाकारली नाही. सुदैवाने हा स्फोट गर्दीत झाला नाही अन्यथा शेकडो निरपराध नागरिकांचा जीव जाऊ शकला असता. याशिवाय घटनास्थळी पोलिसांनी तातडीने अग्निशामक यंत्राद्वारे परिसर स्वच्छ केल्यामुळे महत्त्वाचे  पुरावे नष्ट झाल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण घटनेच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नांदेडमध्ये २००६ च्या पाटबंधारे नगरातील बॉम्बस्फोट प्रकरणातील अपुऱ्या व कमकुवत तपासामुळे आरोपी सुटल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे यावेळी अशा प्रकारची चूक होऊ नये, अशी ठाम भूमिका सेक्युलर फोरमने मांडली आहे. सेक्युलर फोरमने या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एनआयएकडे सोपविण्यात यावा, सखोल फॉरेनसिक आणि टॉक्सिकोलॉजिकल तपास करून अहवाल सार्वजनिक करण्यात यावा, तपास प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीने राबविण्यात यावी, या घटनेमागील सूत्रधार व्यक्ती किंवा संघटना यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि या घटनेची सत्यशोधन समिती तात्काळ स्थापन करावी अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत. या मागण्यांच्या अनुषंगाने सेक्युलर फोरम राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचीही भेट घेणार असल्याचे यावेळी माजी गृहराज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, ॲड.एम. ए. रहमान सिद्दीकी, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष फारुख अहमद, माजी महापौर अब्दुल सत्तार, आनंद चव्हाण आदींनी सांगितले. वाजेगाव येथील मशिदीत पोलिसांनी घटननंतर दोन दिवसात बैठक घेतली होती; मात्र या बैठकीबाबत आम्हाला काहीही माहिती नव्हती किंवा बैठकीसाठी बोलावणे आले नाही असे सेक्युलर फोरमच्या सदस्यांनी सांगितले.

संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींनी या प्रकरणात निष्पक्षता आणि पारदर्शकता राखून कारवाई केल्यास जनतेचा विश्वास टिकून राहील आणि देशाच्या संविधानाचा सन्मान अबाधित राहील असेही स्पष्ट केले आहे. या पत्रकार परिषदेला कॉ. विजय गाभणे, डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, नगरसेवक साबेर चाऊस, मधुकर सोनसळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागीरदार, प्रदीप नागापूरकर, उज्वला पडलवार, कॉ. गंगाधर गायकवाड आदींची यावेळी उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्र्यांच्या घातपात चौकशीकडेही दुर्लक्ष..नांदेडच्या घटनेचे काय..? नांदेडमध्ये बॉम्बस्फोटसदृश्य घटना पुन्हा एकदा ऐन ईदच्या दिवशी घडलेली असताना या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलीस तसेच प्रशासनाची संशयास्पद भूमिका असल्याचा आरोप माजी गृहराज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी या पत्रकार परिषदेत केला. ज्या राज्यात उपमुख्यमंत्र्यांच्या घातपाताच्या प्रकरणाच्या चौकशीकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते, त्या राज्यात नांदेडसारख्या घटनेचा तपास गांभीर्याने कसा होऊ शकेल? असा सवाल डॉ. किन्हाळकर यांनी उपस्थित केला. स्फोटानंतर अवघ्या काही वेळातच अग्निशमन दलाच्या वाहनाने घटनास्थळ परिसर संपूर्ण धुऊन काढला जातो यातून पोलिसांनी पुरावे नष्ट केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणांच्या तपासाबाबत संशय असल्यानेच आम्ही आता जनतेच्या दरबारात जात असल्याचेही ते म्हणाले. त्याचवेळी राज्याच्या संविधानिक पदावर बसलेल्या अधिकाऱ्यांकडेही आम्ही दाद मागू असेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!