क्राईम

नांदेडच्या चार तरुणांनी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली मुंबईच्या तरुणीला ३२ लाखांना गंडविले..!

मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने चौघांना शनिवारी नांदेडमधून उचलले, दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे सांगत चार दिवस तरूणीला घरातच केले बंदिस्त, अनेक सायबर गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याचेही तपासात झाले निष्पन्न

नांदेड – डिजिटल अरेस्ट संदर्भाने केंद्र आणि राज्य शासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती केली जात आहे. डिजिटल अरेस्ट असा कोणताही प्रकार नसल्याचे वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरीही नांदेडच्या चार तरुणांनी थेट मुंबईतील एका तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांना दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे सांगत डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३२ लाखांना गंडविले आहे. हा प्रकार उघड होताच मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने नांदेडच्या त्या चार तरुणांना उचलले आहे. या प्रकरणामुळे आता नांदेडमधील गुन्हेगारी सायबर स्वरूपातही वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अटक केलेल्या तरुणांमध्ये तिघे इतवारा भागातील तर एकजण सिडकोतील आहे.

मुंबईतील गोरेगाव पूर्व येथे राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीला व्हाट्सअप व्हिडिओ कॉल करून चेन्नई पोलीस दलातील सब इन्स्पेक्टर अरुण कुमार बोलत असल्याचे सांगितले. मुंबई पोलिसांनी पहेलगाम हल्ल्यातील दहशतवादी अफजल खान याला अटक केली आहे त्याच्याकडे तुमच्या आजीच्या नावाचे सिम कार्ड सापडले आहे. या सिम कार्डवरून देशाची गोपनीय माहिती शत्रू राष्ट्राला पुरविण्यात आली आहे, असे त्यांनी फोनवरून सांगितले. यादरम्यान घाबरलेल्या कुटुंबांचा कुटुंबाचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी हा कॉल मुंबई एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ट्रान्सफर केल्याचेही दर्शविले. या सर्व प्रकारादरम्यान त्यांनी पोलीस गणवेशही परिधान केला. त्यांच्यामागे दहशतवाद विरोधी पथक मुंबई असा फलकही लावण्यात आला होता. तुमचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे सांगत या तरुणांनी त्या  तरुणीला आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरटीई नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यांना तीन ते चार दिवस घराबाहेरही पडू दिले नाही. ही डिजिटल अरेस्ट असल्याचे सांगितले.

त्याचवेळी तपासणीच्या नावाखाली तुमची बँक खाते सुरक्षित आहेत की नाही हे तपासण्यासाठी खात्यातील पैसे आरबीआय प्रतिनिधीच्या खात्यावर पाठवावे लागतील आणि तपासणीनंतर ते परत केले जातील, असे खोटे आश्वासन देऊन आरोपींनी फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने ३२ लाख ६९ हजार ९९७ रुपये उकळले. आरोपींनी तरुणीला बनावट एफआयआर, अटक वॉरंट आणि इम्युनिटी सर्टिफिकेट देखील पाठवले होते. हा सर्व प्रकार फेब्रुवारी महिन्यात घडला होता.

सदर तरुणीचे वडील जर्मनीत होते जर्मनीतून परत येताच त्यांनी पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. मुंबई पोलिसांनी केलेल्या सर्व तपासात तांत्रिक बाबी आधारे तरुणीची फसवणूक करणारे आरोपी हे नांदेडचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये निलेश प्रभाकर वासमवार वय २५, रा.साईनगर सिडको, शुभम संजय जोगदंड वय २५, रा. शक्तीनगर इतवारा नांदेड, अजय देविदास भोसले वय २५, रा. लोहार गल्ली इतवारा नांदेड आणि सिद्धांत दिलीप जोंधळे वय १९ रा. शक्तिनगर इतवारा या चौघांचा समावेश आहे. या चौघांनी इतरही अनेक सायबर गुन्ह्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या चौघांनाही मुंबई पोलीस दलाच्या विशेष पथकाने नांदेडमधून शनिवारी उचलले आहे. त्यांच्या अटकेची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यांना अटक करण्यासाठी नांदेड पोलीस दलाचीही मदत घेण्यात आल्याचे इतवारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!