महापालिका

खुशखबर..! कौठावासियांना उद्यापासून होणार २४ तास पाणीपुरवठा

नांदेड महापालिकेच्या पायलट प्रोजेक्टचे माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होणार, १४१४ मालमत्ताधारकांना मिळणार लाभ..!

नांदेड – केंद्र शासनाच्या अमृत 2.0 योजनेअंतर्गत कौठा भागासाठी मंजूर असलेल्या २४ तास पाणीपुरवठा योजनेला ३० मार्चपासून प्रारंभ केला जाणार आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते या पायलट प्रोजेक्टचे उद्घाटन होणार असल्याची माहिती शहर अभियंता सुमंत पाटील यांनी दिली. महापालिका या पायलट प्रोजेक्टसाठी २ कोटी ६६ लाख रुपये खर्च करणार आहे. २४ तास पाणीपुरवठा हा प्रोजेक्ट संपूर्ण शहरात पाच टप्प्यांमध्ये कार्यान्वित केला जाणार आहे. कौठा भागातील या प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर संपूर्ण शहराला मीटरद्वारे पाणीपुरवठा देण्याची योजना असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नांदेड शहरात जवळपास ६५ हजार नळ कनेक्शन आहेत शहराची एकूण लोकसंख्या पाहता शहराला पाणीपुरवठ्यासाठी होणारा खर्च आणि पाणी करातून मिळालेली रक्कम यात मोठे अंतर आहे राज्यातील अनेक शहरांमध्ये मीटर द्वारे पाणीपुरवठा होतो हाच प्रकल्प आता नांदेड महापालिकेकडूनही राबविला जाणार आहे केंद्र शासनाच्या अमृत 2.0 योजनेअंतर्गत कौठा भागात या पायलट प्रोजेक्टला मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प दिवाळीमध्ये कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेने हालचाली केल्या होत्या; मात्र तो पूर्ण होऊ शकला नाही. आता उद्या ३० मार्चपासून हा प्रकल्प अखेर प्रत्यक्षात सुरू होणार आहे. कौठा भागातील १४१४ मालमत्ता धारकांना आता २४ तास पाणीपुरवठा उपलब्ध राहणार आहे. त्याचवेळी हे पाणी मीटरद्वारे दिले जाईल. कौठा येथे महापालिकेचा जलकुंभ आहे. या जलकुंभावरून हा पाणीपुरवठा केला जाणार आहे. महापालिकेच्या या पायलट प्रोजेक्टसाठी पाणीपुरवठा विभागाने २ कोटी ६६ लाख रुपये खर्च केले आहेत. यामध्ये नळधारकांना महापालिका अल्ट्रा सॉनिक कंपनीचे अत्याधुनिक पाणी मीटर देणार आहे. ज्याद्वारे रवी नगरवासियांना २४ तास पाणी उपलब्ध राहील; मात्र या पाण्याची नोंद मीटरवर होईल. जितका पाणी उपसा तितके बिल असे धोरण पुढे राबवले जाणार आहे. सध्या या भागात दरवर्षी साडेतीन हजार रुपये हा शहरातील इतर भागातील नळधारकांना येणाऱ्या खर्चाप्रमाणेच पाणी कर भरावा लागणार आहे. हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर  शहरातील भाग्यनगर, बोरबन, वजीराबाद आदी भागांमध्ये २४ तास पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महापालिका दरवर्षी पाणीपुरवठ्यासाठी जवळपास ३५ कोटी रुपये वार्षिक खर्च करत असते. पाणीपुरवठ्यासाठी होणारा खर्च आणि पाणी करातून मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ निश्चितच बसत नाही. त्यामुळे महापालिका आता आगामी काळात पाणीपुरवठ्याच्या धोरणामध्ये बदल करणार आहे. त्यातील हे पहिले पाऊल असल्याचे शहर अभियंता सुमंत पाटील यांनी स्पष्ट केले. महापालिका अधिकाऱ्यांच्या निवासस्थानीही लवकरच पाणी मीटर बसवण्यात येणार आहेत.

नांदेड शहरात १६७ कोटींची कामे मंजूर…                     केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 योजनेअंतर्गत नांदेड शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचे बळकटीकरण व संलग्निकरण करणे यासाठी १६७ कोटी ७५ लाख रुपयांचे काम मंजूर आहे. हे काम ९ ऑक्टोबर २०२४ च्या आदेशान्वये शारदा कन्स्ट्रक्शन अँड कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले आहे. सदरील कामांमध्ये प्रभाग क्रमांक १९ रवीनगर कौठा भागात प्रायोगिक तत्त्वावर २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी २ कोटी ६६ लाख ३५ हजार ३०० रुपये मंजूर आहेत. या कामांतर्गत २५ लक्ष लिटर क्षमतेच्या रवीनगर जल कुंभावरून २४ तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी जवळपास दोन कि.मी. अंतरात जलवाहिनी टाकण्यात आली आहे. १४१४ अल्ट्रासोनिक वॉटर मीटर बसवण्यात आले आहेत. हा २४ तास पाणीपुरवठा रवी नगर, श्रीपाद नगर, कपिलेश्वर नगर, जुना कौठा मूळ गाव, श्रीराम नगर, विकास नगर, गोकुळधाम हाऊसिंग सोसायटी, शगुन सिटी, नरोबा मंदिर भाग इत्यादी ठिकाणी होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!